बार्शी काँग्रेसच्यावतीने तहसीलसमोर ठेचा-भाकरी खाऊन शासनाचा निषेध

बार्शी ( प्रतिनिधी )बार्शी तालुक्यात अतिवृष्टी आणि, विविध नद्यांच्या महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाईची (मदत) रक्कम राज्य शासनाने बाधित आणि, शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावी यासाठी आज रोजी तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने शहरातील तहसिलदार कार्यालयासमोर एका अनोख्या पध्दतीने निदर्शन आंदोलन करण्यात आले.
सदर नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने फक्त मदतीची घोषणा केली. दिवाळीसारखा महत्वाचा सण तोंडावर असताना मायबाप शासनाने अद्यापपर्यंत बाधित व, शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम का दिली नाही अशी विचारणा यावेळी प्रशासनास करण्यात आली. पुरेशी आणि, योग्य ती मदत तात्काळ देवून तालुक्यातील बाधित-शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणीही याठिकाणी प्रशासनाकडे करण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून येथील तहसील कार्यालयासमोर ठेचा-भाकरी खाऊन प्रशासनाला सदरील मुद्द्यांबाबत निवेदन सादर करीत आजचे हे निषेध आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष सतिश पाचकुडवे, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष रमेश खांडेकर, अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष आझम शेख यांच्यासह तात्याराव गायकवाड, बप्पाजी सुतार, करण जानराव, बापू भिसे, संतोष शेट्टी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.


