सोलापूर

अक्कलकोट तालुक्यात BSNL सेवा ठप्प; खासदार प्रणिती शिंदे यांचा संसदेत केंद्र सरकारला जाब

संसदेत या प्रश्नावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे उत्तर – 4G सुधारणा पूर्ण झाल्यानंतर लवकरच 5G सुरू होणार

नवी दिल्ली -आंतरराज्य सीमेवर असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट तालुक्यात BSNL ची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प झाल्याचा गंभीर मुद्दा खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत उपस्थित केला.

गेल्या एका वर्षापासून BSNL अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना मोबाईल व इंटरनेट सेवांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही त्यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

देशात एकीकडे 5G सेवांचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जात असताना ग्रामीण व सीमावर्ती भागात मूलभूत नेटवर्क सुविधांचाही अभाव असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. BSNL च्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी आवश्यक निधी न दिल्यामुळे ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेने ढकलली जात असल्याचा आरोपही खासदार शिंदे यांनी केला.

“BSNL ची सध्याची यंत्रणा कार्यक्षम नसताना ती बदलण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी केंद्र सरकार नेमकी कोणती ठोस पावले उचलणार?” असा थेट सवाल त्यांनी संसदेत उपस्थित केला.

अक्कलकोटसारख्या सीमावर्ती भागातील नागरिकांना तातडीने दर्जेदार दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

यावर उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी BSNL च्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू असून, 4G सेवा अधिक सक्षम केल्यानंतर लवकरच 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button