देश - विदेश

राज्यसभा निवडणुकीत एनडीएचे वर्चस्व: बहुमताचा आकडा ओलांडून १३९ जागांवर मजल

नवी दिल्ली – नुकत्याच दहा राज्यांमध्ये पार पडलेल्या राज्यसभेच्या ३७ जागांच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) मोठे यश संपादन केले आहे. एकूण ३७ पैकी २६ जागांवर निवडणूक आधीच बिनविरोध पार पडली होती. उर्वरित ११ जागांसाठी सोमवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एनडीएने आठ जागा जिंकल्या असून, बिजू जनता दल आणि एका अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक जागा मिळवली आहे. या निवडणुकीत बिहार आणि ओडिशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग पाहायला मिळाले. यात बिहारमध्ये काँग्रेसची तीन आणि ओडिशात काँग्रेस तसेच बिजू जनता दलाची मिळून पाच मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिहारमध्ये झालेल्या पाच जागांच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सर्वच्या सर्व पाच जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विशेष म्हणजे या विजयी उमेदवारांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचाही समावेश आहे. या महत्त्वाच्या मतदानावेळी काँग्रेसचे तीन आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.
दुसरीकडे, ओडिशात चार जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये भाजपने दोन जागांवर विजय नोंदवला, तर बिजू जनता दलाचा एक उमेदवार विजयी झाला. चौथ्या जागेवर भाजपच्या पाठिंब्याने उभे असलेले अपक्ष उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांनी विजय मिळवला. दिलीप रे यांना निवडून आणण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अखेर काँग्रेस व बिजू जनता दलाची पाच मते फुटल्याने त्यांचा हा विजय सुकर झाला.
हरियाणात दोन जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपने एक जागा जिंकली. मात्र दुसऱ्या जागेवर काँग्रेसच्या दोन आमदारांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करत भाजपने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली. या घडामोडींवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून या हस्तक्षेपाला विरोध दर्शवला, परिणामी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी रखडली होती.
या विजयामुळे आता राज्यसभेतील गणिते पूर्णपणे बदलली आहेत. सभागृहातील एकूण २४५ जागांपैकी दोन जागा रिक्त असल्याने सद्यस्थितीत २४३ सदस्यांच्या बळावर बहुमताचा आकडा १२२ वर आला आहे. एनडीएने हा टप्पा सहज पार करत १३९ जागांचे पाठबळ मिळवले असून त्यांच्याकडे बहुमतापेक्षा १७ जागा जास्त आहेत. या १३९ मध्ये एकट्या भाजपकडे १०६ खासदारांची भक्कम ताकद आहे. तर विरोधी इंडिया आघाडीकडे ७६ जागांचे बळ असून, त्यात काँग्रेस २९ जागांसह सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. तसेच सभागृहात अन्य २८ सदस्य उपस्थित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button