पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्यावरील नाट्य ठरले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
करमाळा ( प्रतिनिधी ): रावगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा उपस्थित होत्या. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून डॉ गणेश भाऊ करे पाटील व प्रा.विष्णू शिंदे सर यांची उपस्थिती लाभली यावेळी रावगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व आजी-माजी पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या अंजना कृष्णा यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः मुलींनी शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पाहावीत आणि आयुष्यात उच्च ध्येय गाठण्याचा निर्धार करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी डॉ. गणेश भाऊ करे पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या प्रगतीचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागात असूनही विद्यालयाने शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील एक सक्षम शिक्षणकेंद्र म्हणून हे विद्यालय नावारूपाला येत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना योग्य दिशा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमादरम्यान एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला. या नाट्यप्रयोगातून विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांचे अदम्य शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याप्रती असलेली अखंड निष्ठा अत्यंत प्रभावीपणे साकारली. विद्यार्थ्यांच्या दमदार अभिनयाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. एकूणच विद्यार्थ्यांच्या कलेचा, जिद्दीचा आणि संस्कारांचा संगम घडवणारा हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब सरडे, किरण परदेशी, हनुमंत रासकर, प्रताप बरडे, विलास पाटील, विशाल राठोड, रुपेश मोरे, ज्ञानेश्वर निंबाळकर, सुहास कानगुडे आणि सुरेश अण्णा बरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.



