एसटीत मद्यपानास ‘शून्य सहनशीलता’; चालक-वाहकांची दरराेज अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती….!
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
२५ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते.
त्या अनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. सदर चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.



