राष्ट्रपिता महात्मा गांधीजी स्मृतीदिन

सत्य आणि अहिंसेच्या महात्मा गांधींच्या लढ्याची ठिणगी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत पडली, आणि संपूर्ण जगाचे विसावे शतक त्या प्रकाशाने व्यापून गेले. गांधींच्या सत्याग्रहाच्या त्या विशाल वृक्षाचे लहानसे रोपटे प्रथम रुजले ते दक्षिण आफ्रिकेत त्यांनी स्थापन केलेल्या डर्बनजवळील ‘फिनिक्स सेटलमेंट’ आणि जोहान्सबर्गजवळील ‘टॉल्स्टॉय फार्म’ या आश्रमांच्या रूपाने. भारतात परतल्यावर गांधींनी गुजरातमध्ये अहमदाबादजवळील ‘कोचरब आश्रम’ (नंतर साबरमती आश्रम) आणि महाराष्ट्रात वर्ध्याजवळील ‘सेवाग्राम’ या आश्रमांची स्थापना केली. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या उत्तरार्धात गांधींचा निवास दीर्घकाळ सेवाग्राममध्येच होता. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या उत्तरार्धात गांधींचा निवास दीर्घकाळ सेवाग्राममध्येच होता.
महात्मा गांधींच्या भारतातील राजकीय जीवनाचा प्रारंभही महाराष्ट्रातच झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरु होते. गांधी आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची पहिली भेट १२ ऑक्टोबर १८९६ रोजी पुण्यात झाली होती. गांधींनी १९१८ मध्ये ‘गोखले: माझे राजकीय गुरु’ हे पुस्तकही लिहिले. गोखले यांच्याच सूचनेनुसार गांधीजींनी १९१५ मध्ये भारत आल्यानंतर संपूर्ण देशाचा दौरा करून भारत समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. गोखले यांनीच गांधीजींना अहिंसक राजकारणाची प्रेरणा दिली, ज्याचा प्रभाव गांधीजींच्या पुढील स्वातंत्र्य चळवळींवर दिसतो. १९२०मध्ये लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर मुंबईत गिरगाव येथील अंत्ययात्रेत गांधीजीनी आपला खांदा दिला होता, ही एक प्रतीकात्मक घटना ठरली, कारण टिळक गेल्यानंतर स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व गांधींच्याच खांद्यावर आले.
३० जानेवारी १९४८ हा दिवस हा जगाच्या इतिहासातील एक काळा दिवस. याच दिवशी नथुराम गोडसे या पुण्यातील महाराष्ट्रीय माणसाने महात्मा गांधीची हत्या केली, ही गांधी आणि महाराष्ट्र यांच्या संबंधातील एक दुर्दवी घटना होती.
प्रमोद मुनघाटे



