मंत्री नरहरी झिरवाळ यांची आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरल ,काँग्रेसकडून राजीनाम्याची जोरदार मागणी

मुंबई – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख नेते नरहरी झिरवाळ यांची एक आक्षेपार्ह चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर वेगाने पसरत आहे. या चित्रफितीत ते पवन यादव नावाच्या एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत दिसत आहेत. ही धक्कादायक घटना मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडली असून, तिथे बिछान्यावर त्यांच्या शेजारी मद्य आणि खाद्यपदार्थही ठेवलेले दिसत आहेत. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेस पक्षाने त्यांच्या तत्काळ हकालपट्टीची आणि राजीनाम्याची मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासीबहुल मतदारसंघाचे आमदार असलेले नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. व्हायरल झालेली ही चित्रफीत सुमारे सात महिन्यांपूर्वीची असल्याचे उघडकीस आले आहे. या चित्रफितीत दिसणारा तृतीयपंथी पवन यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणी उकळल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. या संपूर्ण प्रकरणाची झिरवाळ यांना पूर्वकल्पना होती. त्यामुळेच त्यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वी याच मंत्र्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्या वेळीही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षात मोठी अस्वस्थता व गोंधळ सुरू आहे. त्यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवण्याची पहिली मागणी झिरवाळ यांनीच केली होती. दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. सध्या सुरू असलेल्या या गोंधळात, पक्षातील अंतर्गत स्पर्धेतून मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचे अत्यंत ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले आहे आणि त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधला असता, साहेबांना याप्रकरणी काहीही बोलायचे नाही, असे स्पष्ट करण्यात आले. जर या चित्रफितीवरून झिरवाळ यांना राजीनामा द्यावा लागला, तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील.



