महाराष्ट्र

सत्यता पडताळून कारवाईचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई – राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या वादाला आणि चर्चेला तोंड फुटले आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ एका अत्यंत गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी रात्रीपासून त्यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे प्रशासकीय व राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, विरोधी पक्षांनी आता नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही पवन यादव नावाची ट्रान्सवुमन असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पवन यादव हिच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात यापूर्वीच खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. तिच्याच भावाने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणल्याचे समजते. या व्हिडिओमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मद्यपान आणि काही आक्षेपार्ह कृत्ये घडत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे बोलले जात असून, तो नेमका आताच का बाहेर काढण्यात आला, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मात्र हा आपल्या नेत्याला जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी रचलेला कट असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
या गंभीर प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दखल घेतली आहे. त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “नरहरी झिरवाळ यांनी स्वतः मला दूरध्वनी करून संपर्क साधला. हा व्हिडिओ तीन ते चार वेगळे व्हिडिओ एकत्र जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी मी त्यांना तत्काळ पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “या व्हिडिओची आता पूर्णपणे तांत्रिक शहानिशा करण्यात येईल. यातून जी सत्य परिस्थिती समोर येईल, ती पडताळून पाहिल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून आम्ही सर्व मिळून एक संयुक्त निर्णय घेऊ.” तसेच त्यांनी एका जुन्या घटनेचा संदर्भ देत सांगितले की, “मागील वेळी घडलेल्या एका घटनेची चौकशी केली असता, त्यात नरहरी झिरवाळ यांचा कोणताही सहबंध नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता समोर आलेले हे नवीन व्हिडिओ अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याची सत्यता पडताळणे अत्यंत आवश्यक आहे. जर हे व्हिडिओ सत्य असल्याचे निष्पन्न झाले, तर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल,” असा कडक इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button