राजकीय
अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीतील प्रचार अंतिम टप्प्यात !

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील सर्वच पक्षाचां प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून सर्वच पक्षाच्या उमेदवारानी प्रचाराचा वेग वाढविला आहे. अक्कलकोट शहरातील वार्डात नेते व कार्यकर्ते यांची वर्दळ वाढली असून प्रत्येक उमेदवार हा मतदारांचे पाय धरून मतदान करण्याची विनंती करत आहे.
अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा जण रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी सर्वपक्षीय ७६ उमेदवार हे मैदानात आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी , शिवसेना शिंदे गट , काँग्रेस पक्ष यांच्यात लढत होत आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी , काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशपाक बळोरगी , शिवसेनेचे उमेदवार रईस टिनवाला यांच्यात लढत होत आहे. भाजपाचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांनी पदयात्रा ,कॉर्नर सभा , होम टू होम प्रचार करत मतदारांना भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रात्रीचा दिवस करत प्रचाराची धुरा सांभाळली आहे .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रचार पदयात्रा , कॉर्नर सभा , जाहीर सभा तसेच मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत भाजपाचे उमेदवारांना उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे .अक्कलकोट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदाराने भाजपाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेऊन मतदारांना भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशपाक बळोर्गी यांनी पदयात्रा , सभा , कॉर्नर बैठक , कॉर्नर सभा घेऊन प्रचारावर जोर दिला आहे. अक्कलकोट शहरातील प्रत्येक वार्डात प्रचारासाठी अशपाक बळोर्गी फिरत आहेत. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील , काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉक्टर सुवर्ण मलगोंडा आदींसह काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार पदयात्रा काढून विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रईस टिनवाला यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रईस टिनवाला व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी प्रभागांमध्ये कॉर्नर सभा , पदयात्रा , थेट मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. रईस टिनवाला हे प्रत्यक्ष मतदारांना घरोघरी जाऊन भेट देऊन शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे जिल्हाप्रमुख अमर पाटील आदींसह शिवसेनेचे नेते मंडळी व पदाधिकारी हे अक्कलकोट शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन सभा , कॉर्नर सभा , बैठका , पदयात्रा घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करत आहेत.
अक्कलकोट शहरातील सर्वच वार्डात सर्वपक्षीय नगरसेवक पदाचे उमेदवार हे प्रचारासाठी फिरत असून मतदारांना मतदान करण्याचे विनंती करत आहेत .शहरातील २५ वार्डात काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असून या लढतींकडे मतदार नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राम जाधव ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार इक्रार शेख यांनीही प्रचारासाठी जोर दिला आहे.अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून सर्वच उमेदवार हे प्रचारासाठी मतदारांच्या दारोदार फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.






