
सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ; औद्योगिक व पर्यटन विकासाला नवी गती मिळणार
सोलापूर — सोलापूर – मुंबई या नव्या विमानसेवेचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या नव्या विमानसेवेच्या सुरूवातीमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी ते म्हणाले की, “सोलापूरला नाईट लँडींग सुविधा तसेच मोठ्या बोईंग विमानांची सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
केंद्र सरकारच्या उडान (RCS) योजनेअंतर्गत ही विमानसेवा सुरू करण्यात आली असून, राज्य सरकारने तुट भरून काढण्यासाठी १८ कोटी रुपयांचे गॅप फंडिंग मंजूर केले आहे. सोलापूर विमानतळ कार्यान्वित झाल्याने भविष्यात आयटी पार्क उभारण्याचाही मानस शासनाने व्यक्त केला आहे, ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, सोलापूर हे दक्षिणेकडील गेटवे असून पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूर या धार्मिक स्थळांमुळे पर्यटन वाढेल व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयराव देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माळशिरस आमदार राम सातपुते, माजी आमदार नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयजी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, भाजपा शहर अध्यक्ष सौ. रोहिणी तडवळकर, तसेच स्टार एअरचे प्रतिनिधी संजय घोडावत आणि विमानतळ प्राधिकरणाच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी उपस्थित होते.