सामाजिक
बोरोटी येथे श्री काशीलिंगेश्वर मंदिराचा कळसारोहण निमित्य विविध धार्मिक कार्यक्रम

अक्कलकोट :- ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे नूतन श्री काशीलिंगेश्वर मंदिराच्या कळसारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. या धार्मिक कार्यक्रमांचे नेतृत्व हिरे जेवर्गी येथील श्री जयगुरुषांत लिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी करीत आहेत, अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्र–कर्नाटक सीमावर्ती भागातील बोरोटी गाव ‘नूतन दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. सामाजिक सलोखा, धार्मिक परंपरा व सांस्कृतिक एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री काशीलिंगेश्वर मंदिराच्या निमित्ताने पहिल्यांदाच जिल्हा व राज्य पातळीवर लक्ष वेधून घेणारा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता महापुराण आयोजित करण्यात आले होते. १ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. नूतन श्री काशीलिंगेश्वर मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढून मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
धान्य दिवस, बिल्वपुष्प दिवस, क्षीर दिवस, यज्ञमंडप पूजन, श्री रुद्र होम, नवचंडी होम आदी धार्मिक विधी अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडले. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता श्री रुद्र होम तर दुपारी 3 वाजता नवचंडी होम संपन्न होणार आहे.
गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी नूतन लिंगाचे संस्कार होणार असून त्यानंतर रंभापूरी, उज्जैन व काशी पीठाचे जगद्गुरूंचा अड्ड पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गावरून मोठ्या भक्तिभावात काढण्यात येणार आहे. या पालखी सोहळ्यात विविध सांस्कृतिक संघटनांचा सहभाग असणार असून हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
दुपारी १२.४५ वाजता जगद्गुरूंच्या अमृतहस्ते श्री काशीलिंगेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मंत्रोपदेश, कळसारोहण, नवचंडी होम व पूर्णाहुती पार पडणार आहे. त्यानंतर धर्मसभा व जगद्गुरूंचे आशीर्वचन होऊन महाप्रसादाने या भव्य धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध पीठांचे महास्वामीजी, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बोरोटी गावात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असून सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री काशीलिंगेश्वराची कृपा प्राप्त करावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




