न्या.भूषण गवई यांच्यावरील हल्ला म्हणजे, आपल्या देशाच्या संविधानावरील हल्ला. – उपाध्यक्ष अक्षय कांबळे

सोलापूर – सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश न्या.भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. सदर हल्ला केवळ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेला हल्ला नसून हा भारतीय संविधान आणि, न्यायव्यवस्थेवर केलेला थेट स्वरुपातील मोठा हल्ला आहे.
महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी याबाबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ याठिकाणी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की; न्या.भूषण गवई हे आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि, कार्यक्षमतेच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत. भारतीय संविधान आणि, लोकशाहीवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, येथील काही वर्णवर्चस्ववादी आणि मनुस्मृतीच्या समर्थकांना बहुजन समाजातील एका व्यक्तीने उच्च पदावर पोहोचलेले सहन झालेले नाही. याच कारणामुळे सध्या देशात बहुजन समाजातील अनेक उच्चपदस्थ व्यक्तींवर वेळोवेळी अन्यायकारक आणि, हिंसक स्वरुपाचे हल्ले होत आहेत. हा हल्ला फक्त व्यक्तीगत नसून तो आपल्या देशाच्या लोकशाहीवर आणि, न्यायव्यवस्थेवर केलेला फार मोठा आघात आहे.
महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी पुढे सांगितले की; भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि, न्यायव्यवस्थेचा अपमान करण्याचा हा प्रकार म्हणजे केवळ न्यायालयीन नियमांचे उल्लंघन नाही तर, तो समाजातील समता व बहुजन नेतृत्वाच्या विरोधात केलेले धाडस आहे. सदर निंदनीय घटनेचा आमच्या पक्षाकडून आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आहोत.
भूषण गवई हे सरन्यायाधीश म्हणून न्यायालयीन निर्णयांच्या अधिकच्या पारदर्शकतेसाठी आणि, आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांसाठी सतत काम करीत आहेत. त्यामुळे, त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसोबतच संविधान आणि न्यायव्यवस्थेची सुरक्षादेखील अतिशय महत्त्वाची ठरते. महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी याउपर म्हटले की; लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आणि, प्रत्येक पदावर असलेल्या व्यक्तीस सुरक्षेची खात्री असणे अत्यावश्यक आहे. देशातील न्यायालयांत होत असलेल्या अशा हिंसाचाराच्या घटनांमुळे नागरिकांचा विश्वास धोक्यात येत आहे. ही घटना केवळ न्यायालयीन हल्ला नसून समाजातील बहुजन नेतृत्वावर होणाऱ्या सततच्या आघाताचे प्रतीक आहे. अक्षय कांबळे यांनी सर्व नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले असून आपले भारतीय संविधान आणि, आपल्या लोकशाही व्यवस्थेसाठी प्रत्येकाने एकत्र येवून संरक्षण करण्याचे आवाहनही केले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा विद्यार्थी काँगेस संघटनेचे अध्यक्ष चैतन्य घोडके, ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे उपाध्यक्ष देविदास गायकवाड, आनंद मोरे, अजितकुमार पवार, आदी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.