राजकीय

“सत्तेपेक्षा सेवा! दिनेश मांगले यांचा ऐतिहासिक निर्णय”

 

परांडा / धाराशिव ( फारूक शेख )परंडा तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये काल राजकारणाच्या रंगमंचावर एक असा निर्णय घडला, की ज्याने प्रत्येक कार्यकर्त्याचे, मतदाराचे आणि सामान्य जनतेचे मन भारावून गेले. जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष घोषित झाल्यानंतर सर्वांचं लक्ष एकाच नावाकडे लागलं होतं – जनतेचा विश्वासू चेहरा दिनेश रोहिदास मांगले.

परंतु सर्वांना धक्का देणारा आणि त्याचवेळी अंतःकरण पिळवटून टाकणारा निर्णय दिनेश मांगले यांनी जाहीर केला – ते आगामी निवडणूक लढवणार नाहीत!

गेल्या अनेक वर्षांपासून घराणेशाहीच्या राजकारणामुळे लोक वैफल्यग्रस्त झाले होते. त्यातूनच दिनेश मांगले हे लोकांसाठी नवा किरण, नवा पर्याय म्हणून समोर आले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि समाजसेवेतील निष्ठेमुळे प्रत्येक मतदाराच्या मनात “यावेळी आपला खरा प्रतिनिधी मिळणार” अशी आशा फुलली होती. पण या निर्णयाने मागे हटताना देखील त्यांनी लोकांच्या हृदयात आपलं स्थान अधिकच उंचावलं आहे.

स्वतः दिनेश मांगले म्हणाले :

“लोकसेवा माझ्यासाठी राजकारणाचा मार्ग नाही, तर जीवनाचा श्वास आहे. सत्ता, पद वा प्रतिष्ठेपेक्षा जनतेचा विश्वास हा माझ्यासाठी मोठा खजिना आहे. मी निवडणूक लढवत नसल्याचा निर्णय घेतला असला तरी माझं समाजकार्य अखंड सुरूच राहील. मी कायम तुमच्यातला एक, तुमच्यासोबतच राहणार आहे.”

त्यांच्या या शब्दांनी अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण हा निर्णय फक्त एका उमेदवाराचा माघार नाही, तर प्रामाणिकतेचा, निस्वार्थ सेवेचा आणि लोकांवरील नात्याचा पुरावा आहे.

आज परांडा–शेळगाव सर्कलमध्ये राजकीय भूकंप घडला आहे; पण त्याचवेळी समाजकारणाला एक नवी दिशा मिळाली आहे. निवडणुकीच्या गदारोळातही सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देणारा नेता अस्तित्वात आहे, हा विश्वास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button