स्वर्गीय स्वामी भिताडे यास यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडून १० लाख रुपयाचा विमा वितरण

करमाळा ( आयुब शेख ) – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कला शाखेत बी.ए.भाग-1 मध्ये शिकत असलेला विद्यार्थी स्वामी नितीन भिताडे रा.सरपडोह याचा काही दिवसापूर्वी अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता. या त्याच्या अपघाती मृत्यू संदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , सोलापूर व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा यांच्या मार्फत तरतूद असलेल्या टाटा ए आय जी या विमा कंपनीकडे महाविद्यालय प्रशासनाने वेळोवेळी संस्थेचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर यांच्या मार्गदर्शन खाली पाठपुरावा केला होता. यासाठी सरपडोह गावचे सरपंच, उपसरपंच व मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंब यांनी देखील सहकार्य केले होते.अपघाती विमा पाठपुराव्यास महाविद्यालयाला यश आले. या विमा वितरण प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर यांनी गावकऱ्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करून भिताडे कुटुंबीयांच्या पाठीशी असेच गावकऱ्यांनी खंबीरपणे उभा राहावे असे आव्हान केले व मृत स्वामी याचा भाऊ प्रतीक हा महाविद्यालयात आता 12 वी सायन्स या वर्गात शिकत असून याच्या शिक्षणाचा खर्च तो महाविद्यालयात शिक्षण घेत असेपर्यंत संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्थेची असेल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी विमा कंपनीतून प्राप्त झालेल्या 10 लाख रुपये रकमेच्या विमा प्रमाणपत्राचे वितरण संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील यांच्या हस्ते मृत विद्यार्थ्यांची मातोश्री श्रीमती वनिता भिताडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, सरपडोह गावचे सरपंच सौ.मालन पांडूरंग वाळके, उपसरपंच .नाथाराव रंधवे, . अरुण चौगुले , . रामचंद्र कवडे आदी ग्रामस्थ या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.