विद्रोही साहित्यिक : अण्णा भाऊ साठे
साहित्यरत्न,साहित्य सम्राट,लोकशाहीर बहुजननायक,विज्ञानवादी विचारवंत,वास्तववादी लेखक,कॉम्रेड अण्णा भाऊ साठे विद्रोही विचाराचे लेखक होते.संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील “नाठाळाच्या माथी हाणावी काठी“ हा विद्रोह किंवा
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा,” याचा अर्थ जो दुसऱ्यांच्या दुःखात सामील होतो,रंजले-गांजलेल्यांना आपले मानतो,तोच खरा साधू आहे.देवही अशा ठिकाणी असतो. इथे संत तुकाराम महाराज सामाजिक समतेचा संदेश देतात. अगदी याचप्रमाणे ह्या आधुनिक तुकाराम उर्फ अण्णा भाऊ साठे यांचे लेखनही वास्तववादी व विद्रोही आहे.
प्रत्येक महान महापुरुषांच्या जीवनाची वैयक्तिक जीवनव्यथा,तीच आवस्था काॅंम्रेड अण्णा भाऊ साठे यांचीही आहे,त्यामुळे मी जास्त त्यावर भाष्य करणार नाही.
०१/०८/१९२० वाटेगाव ता. वाळवा जि. सांगली येथील जन्म,दीड दिवसाची शाळा,वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास,मुंबईचं हलाखीच जगणं,ते जगणं कसलं?रोजचं मरणं,यातून तावून सुलाखून लेखक होणं,त्या काळी आपल्या लेखनीच्या जोरावर मुंबई ते रशिया विमानाने प्रवास करणं,हा दैदिप्यमान प्रवास खडतर होता,हा एक सामान्य माणूस ते एका महापुरुषापर्यंतचा प्रवास आपल्यासाठी निश्चित प्रेरणादायक आहे.व प्रेरणादायी राहिल.पण,त्यांचा झालेला करूण अंत ही देखील विचार करायला लावणारी गोष्ट आहे.त्यांचे जीवन हेही वास्तवात एक व्यवस्थेविरोध केलेला विद्रोहच होता.
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची साहित्य संपदा काळजाला भिडणारी आहे,ती जात,पात,धर्म या पलीकडे जावून माणसाचे गीत गाते.त्यात समाजवाद मानवतावाद,वास्तवतावाद, साम्यवाद ठासून भरला आहे.यात खरी धन्यता आहे.त्यांनी साहित्यात जी पात्रे निर्माण केली ते समाजाचे प्रतिनिधीत्व अर्थात माणसाचे प्रतिनिधीत्व करतात.व ही पात्रे माणूस म्हणून कसे जगावे? याचा आदर्श घालून देतात.हाच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा विजय आहे! तोही त्या काळातील समाज व्यवस्थे विरुद्ध केलेला विद्रोहच होता.
साहित्याला सोंदर्य नसतं असं म्हणणाऱ्यांना अण्णा भाऊ साठे फार समर्पक उत्तर देताना दिसतात,साहित्य हे लिहून लिहून,आणि जे लिहिले ते जगून सुंदर होते.साहित्याचे प्रयोजन काय?किंवा साहित्य कशासाठी याचे उत्तर शोधताना ते म्हणतात-
‘उर ब्रम्हांडाचे फोडी,
काळाची हाडे मोडी,
आकाशा खाली ओढी,
तो मी आज नमिला!’
अशा कर्तबगार मानवाच्या कार्याचे गोडवे गाण्यासाठी माझी लेखणी मी पाजळली आहे,असे अण्णा भाऊ साठे म्हणतात.
कला वर्गातीत असावी,ही अपेक्षाही त्यांनी तोडून काढली आहे.जी डमडमच्या गोळ्या मोजते ती आमची कला असावी.जी माडीतल्या मांडीवरच्या खुणा मोजते ती आमची कला नव्हे.’बोक्याची कामवासना शमवण्याचा प्रयत्न करणारी मुलगी आमची कला होऊ शकत नाही.दलितांवर,कष्टकर्यांवर,श्रमिकांवर व त्याच्या संर्घषावर,आणि अंतिम विजय आमचाच आहे, यावर आमचा विश्वास आहे.’यापेक्षा अधिक सुंदर साहित्य प्रयोजन ते काय असते? हा एक प्रकारचा विद्रोह नाही का?
तुम्हाला काही नवीन घडवायचं असेल,व्यवस्था बदलायची असेल,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ले परतवून लावायचे असतील,मूलतत्त्ववाद्यांविरूद्ध शड्डू ठोकायचा असेल,तर तुम्हाला भूमिका घ्यावीच लागते,राजकारण करावंच लागतं.भूमिकेतून पळ काढून चालणार नाही,जगण्यात,लिहण्यात,गाण्यात,नाटकात भूमिका घ्यावीच लागते.ती घेताना एक भान ठेवावं लागतं.साहित्य ही एक कलाकृती असते याचं.आणि अण्णा भाऊ साठे यांनी तेच केले.
‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे,सारस्वतांनो,याद राखा थोडासा गुन्हा करणार आहे’,असं सांगत सुर्वेनी कलात्मकतेचे भान ठेवले,तेच भान ‘जग बदल घालूनी घाव,सांगुनी गेले मज भीमराव’ असे म्हणत अण्णा भाऊ साठेंनी जपलं.काळजातून किंवा स्मृतीपटलांच्या तरंग लहरीतून येणारा प्रत्येक शब्द सुंदरच असतो,त्या त्या गोष्टीचे सौंदर्य त्या त्या गोष्टीतून व्यक्त होत असते,तलवारीचं सौंदर्य धारेत,तर फुलाचे सौंदर्य त्याच्या रंगागंधात असतं,तलवारीला रंग गंध का नाही?हे विचारणं मुर्खपणाच होय!अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याला लाभलेली कलात्मकता अवर्णनीय आहे.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात अवतरणारी मराठी भाषा म्हणजे सौंदर्याचा कळस आहे!तिला कधी अंकुर फुटतात,तर कधी भाले!अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याला विचारांची झळाळी आहे,गंज नाही,त्यांनी स्विकारला मार्क्सवाद येथील विषमतेला कुरवाळणारा नव्हता, तर इथलं जातवास्तव,वर्गवास्तव,धर्मवास्तव,हे पुन्हा पुन्हा मांडण्याला कुणी प्रचार म्हणत असले तर जरूर म्हणावं,असं अण्णा भाऊ साठे ठणकावून सांगतात.अण्णा भाऊ साठेंचं साहित्य आणि लढण्याच्या प्रेरणा या साम्यवादातून आल्या आहेत,ते आतून बाहेरून कम्युनिस्ट होते,हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही!या मुसीतूनच त्याच्यातील साहित्यिक,कवि,शाहीर,कलावंत व कार्यकर्ता बनला होता.आपल्यातील काॅंम्रेड जीवंत ठेवतच त्यांनी शाहू,फुले,आंबेडकरी प्रेरणांना जवळ केलं होतं.त्यांनी वैश्विक मार्क्सवाद जेवढ्या निष्ठेने स्विकारला होता,तसा इथल्या पुरोगामी,परिवर्तनवादी परंपराशी त्यांनी इमान राखलं होतं!एवढं सारं असूनही आपण सातत्याने अण्णा भाऊ साठे यांची तात्विक ओळख कोणती यावर वाद घालत बसतो.अण्णा भाऊ साठे यांना आंबेडकरवादी,फुलेवादी, समतावादी,म्हणण्यात गैर काहीच नाही,पण त्यांच्यात भरलेला मार्क्सवाद खोडून काढणं हे केवळ गैर आणि गैरच आहे.अण्णा भाऊ साठे यांनी मार्क्सवाद कधी सोडला नाही आणि दलितांच्या म्हणजे येथील जातीय प्रश्नाकडे कधी डोळेझाक केली नाही.किती मोठा विद्रोह आहे हा!
“हे जग,ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या,कष्टकर्यांच्या,तळहातावर तरली आहे”.या वाक्याचा अर्थ खूप गांभीर्याने समजुन घेतला पाहिजे, ईश्वर,परमेश्वर अल्ला,देव,गॉड,यांची अनैसर्गिक मालकी असणारी ही पृथ्वी तिचा सातबाराच काॅंम्रेड अण्णा भाऊ साठेयांनी माणसाच्या नावे केला! खूप मोठ्या उत्क्रांतीकडे झेप घेणारं हे वाक्य आहे.ही पृथ्वी,नसलेल्या देवांनी बळकावली होती,ती मानवाच्या,विशेषत्वाने, दलितांच्या,श्रमणाऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या तळहातावर येणं,तिच्यावर श्रमाचं गोंदण लागणं,ही अतुलनीय गोष्ट होय! ती गोष्ट अण्णा भाऊ साठेंनी केली,हा फार मोठा विद्रोह अण्णा भाऊ साठे यांनी केला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही! हे जग श्रम करणारे घडवतात,आणि भांडवलदार ते धनाच्या आणि मनगटाच्या जोरावर बळकावतात,हा खेळ अनंत काळापासून चालू आहे.अण्णा भाऊ साठेंनी या खेळाचा फैसला केला.शेषाच्या मस्तकावरची ही पृथ्वी,जी खगोलीय वस्तु आहे ती दलितांना,कष्टकर्यांना,कामगारांना,श्रमीकांना देऊन टाकली.तिचं लालन पालन करण्याची जबाबदारीही अर्थात पर्यायानं याच मानवावर व मानवता धर्मावर आली.धर्म,आध्यात्म,अंधश्रद्धा, आणि कष्टकरी याच्या लढाईत शेवटी कष्टकरी,मानवच,विजयी झाला!असा अर्थ अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रतित होतो.ही विद्रोही भूमिका त्या काळी घेणे,त्या मुसीतून लेखन करणे, हे अण्णा भाऊ साठे यांच्या सारखा लेखकच करू शकतो.
आता पुन्हा नव्याने या जगाचा मालक कोण?हा प्रश्न ऐरणीवर आला आहे,जुन्या कढ्यांना नव्याने ऊतू येत आहे,नव्याने या धरतीचा मालक कोण? याचा फैसला होतो आहे,नव्या भांडवलशाहीने सन १९९० नंतर पुन्हा एकदा जगावर कब्जा केला आहे. खाजगीकरणाच्या रेट्यात सगळं नव्या भांडवलदारांच्या हातात जात आहे.खाजगीकरण निसर्ग ओरबाडून खात आहे,हवा,पाणी,जमीन,जंगल,डोंगर,नद्या, सुर्य,चंद्र,तारे,ग्रह समुद्र,रस्ते,गॅस ही नैसर्गिक साधनसंपत्ती नव्या भांडवलदारांच्या मालकीची होत आहे,अशा परिस्थितीत नवी लढाई अटळ आहे,आणि ती बहुजन,श्रमिक,कामगारांनी एकत्र येऊन लढाईची आहे.जगावरची अण्णा भाऊ साठेंना अभिप्रेत असणारी मालकी आपण नीट प्रस्थापित केली नाही तर पुन्हा गुलामीचं जग तयार व्हायला वेळ लागणार नाही!म्हणून सर्वांनी मिळून एकञ येऊन ही लढाई लढायची आहे,काॅंम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे जीवनकार्य हे सर्व मानव कल्याणासाठीचे होते हे कोण्या एका जातीपुरते मर्यादित नव्हते,त्यांना जातीत बंदिस्त करणे हा देखील गुन्हा ठरेल,म्हणूनच मानवी कल्याणासाठी सध्यस्थितीत वरील परिस्थितीला मानव म्हणून सामोरे जात असताना प्रत्येक मानवाला वरील सर्वच बाबी विरोधात विद्रोह करावा लागेल,त्यांची शिकवण लक्षात ठेवली पाहिजे-
“रणी पळू नका,
मागे वळू नका,
कुणी चळू नका,
बिनी मारायची अजूनही राहिली,
माझ्या जिवाची होतीया काह्यलि!” ……
काॅंम्रेड अण्णा भाऊ साठे यांची ही आर्त हाक लक्षात घेऊन या मानवी कल्याणाच्या लढाईत अग्रेसर राहण्याचा माझ्यासह सर्वांनी प्रयन्त करू या व त्यांची विद्रोहाची ज्योत जी मानव्याचे हीत साधते ती, तेवत ठेवू या.
लेखक,
भारतीपुत्र,
टी. एस. क्षीरसागर,
सोलापूर
मो.नं.8975622291



