राजकीय
अक्कलकोट तालुका जिल्हा परिषदसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल

अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्हा परिषद गटातून एकूण ७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर पंचायत समिती गणातून १०६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी भली मोठी राग लागली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १७६ उमेदवारानी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तहसील कार्यालयात भाजपा काँग्रेस शिवसेना शिंदे गट वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बुधवारी शेवटच्या दिवशी अक्कलकोट तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये चपळगाव गटातून चार वागदरी गटातून १३, जेऊर गटातून १९,मंगरूळ गटातून बारा ,नागणसूर गटातून आठ , सलगर गटातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर पंचायत समिती गणातून चपळगाव आठ , कुरनूर नऊ ,वागदरी १४ , शिरवळ ९, दहिटणे आठ ,जेऊर ६ , सुलेर जवळगे १० , मंगरूळ पाच , नागणसूर पाच, तोळनूर सहा , सलगर १७ , मुगळी आठ असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी चपळगाव जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी सचिन कल्याणशेट्टी, चपळगाव गणातून सागर कल्याणशेट्टी , वागदरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून प्रवीण दत्तात्रय तानवडे ,कुरनूर गणातून भाजपातर्फे विनोद मोरे , जेऊर पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षातर्फे श्रुती काशिनाथ पाटील , वागदरी जिल्हा परिषद गटातून भाजपातर्फे राजश्री शेळके आदींसह विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तहसील कार्यालयात रात्री नऊ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.






