महाराष्ट्र
देहू संस्थानचा महत्वपूर्ण निर्णय ! संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अनेक वर्षांची प्रथा खंडित

पुणे -जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी सोहळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर यावर्षी देहू संस्थांनकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथला ओढण्यासाठी स्वतःची म्हणजेच संस्थानाच्या मालकीची बैलजोडी खरेदी करणार आहे. दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोडयांना हा मान दिला जायचा.
मात्र यंदाच्या वर्षी बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराजांच्या पालखी रथाला संस्थानने स्वतः खरेदी केलेली बैलजोडी असणार आहे. त्यामुळे यावर्षी पासून बैलजोडी साठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहेत. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर पुढे नेण्याचा देखील मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
विठुरायाच्या भेटीसाठी तुकाराम महाराजांची पालखी दरवर्षी मोठ्या उत्साहात निघते. या पालखी करिता दरवर्षी बाहेरुन बैलगाडी मागवण्याची परंपरा आहे. परंतु आता देहु संस्थानतर्फे घेण्यात आलेल्या नविन निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरु असलेली बैलजोडी मागवण्याची परंपरा खंडित झाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यात देहू संस्थानने हा निर्णय घेतला आहे.




