सामाजिक
माणसे जोडण्याची कला आत्मसात केल्यामुळे यशस्वी झालो-आमदार सचिन कल्याणशेट्टी

पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आयोजित सत्कार समारंभात प्रतिपादन
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
माणसे जोडण्याची कला आत्मसात केली, त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाचा सदस्य होण्याची संधी मिळाली. माणूस केंद्र स्थानी मानून कार्य केल्यामुळे मला विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली, हेच मी माझे भाग्य समजतो असे भावनात्मक प्रतिपादन आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित कै पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, सौ सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र या सर्व शैक्षणिक शाखेच्या वतीने दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल सचिन कल्याणशेट्टी यांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक मुकुंद पत्की होते. व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, उपाध्यक्ष निलप्पा घोडके सचिव भीमराव साठे, महावीर शहा, संचालक मल्लिकार्जुन मसुती, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, रूपाली शहा, पुनम कोकळगी, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत व्हनमाने, बापूजी निंबाळकर, शिवानंद पुजारी, खंडेराव घाटगे, प्राचार्य डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभागाचे दिगंबर जगताप, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या हक्काचा माणूस म्हणून अक्कलकोट मधील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करू दिल्या जातील त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न देखील केले जातील.
मुकुंद पत्की म्हणाले की, अक्कलकोट तालुका सीमावर्ती भागातील प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे येथे मेडिकल कॉलेज व्हावे अशी लोकांची इच्छा आहे.. तालुकास्तरावरील ते पहिले मेडिकल कॉलेज असेल. त्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले, सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार दिगंबर जगताप यांनी मानले
चौकट -आम्हाला आमदार दादाना बघायचंय म्हणत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष..
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे शिक्षण संकुलात आगमन होताच विद्यार्थ्यांनी आम्हाला आमदार दादां ना बघायचंय म्हणत एकच जल्लोष केला. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाके वाजवून त्यांचे भव्य स्वागत केले.