धार्मिक
कल्लप्पावाडीत श्री मंगलदास महाराज यात्रा

अक्कलकोट (प्रतिनिधी) :
कल्लप्पावाडी (ता. अक्कलकोट) येथे जागृत संजीवनी समाधी श्री सद्गुरू मंगलदास महाराज यात्रा यंदाही मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी दीपावली पाडव्यापासून सुरू होत आहे. ही यात्रा शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार असून, या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांतील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. त्यामुळे दरवर्षी यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत असते.
मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता अग्निप्रज्वलन होणार आहे. बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे श्री सद्गुरू मंगलदास महाराज मंदिरात महापूजा होणार आहे. तसेच श्री मंगलदास महाराज व श्री बिरलिंगेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे गंगास्नान करून दुपारी १२ वाजता अग्निप्रवेश होणार आहे.
कन्नड पौराणिक नाटकाचे आकर्षण –
श्री बिरलिंगेश्वर नवरात्र नाट्य संघ, कल्लप्पावाडी यांच्या वतीने ‘श्री महाळिंगेश्वर महात्मे अर्थात गुरू-शिष्यर भेटी’ या भव्य कन्नड पौराणिक नाटकाचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. या नाटकाची भाविक व नाट्यप्रेमींना विशेष उत्सुकता आहे.
गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्ती स्पर्धा होणार असून, रात्री ९ वाजता कन्नड पौराणिक नाटकाचा दुसरा प्रयोग सादर होणार आहे.
शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी श्री मंगलदास महाराज व श्री बिरलिंगेश्वर महाराज यांच्या पालख्यांची गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरात दोन्ही पालख्यांची भेट होणार आहे. यात्रेच्या कालावधीत भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या यात्रेमुळे परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मंगलदास महाराज यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महेश जानकर माजी सभापती वतीने करण्यात आले आहे.



