सोलापूर

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरकरांच्या सेवेत 20 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस दाखल

 

सोलापूर — दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरकरांसाठी आधुनिक, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या २० बसेसपैकी १८ बसेस शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापौर कोंड्याल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

वातानुकूलित बसचे किमान तिकीट केवळ १० रुपये

प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, पहिल्या टप्प्यात २० बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १८ बसेस प्रत्यक्ष सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून दोन बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या सर्व बसेस वातानुकूलित (AC) असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे या वातानुकूलित बससेवेचे किमान तिकीट किमान १० रुपये ठेवण्यात आले आहे. प्रवासाच्या अंतरानुसार पुढील तिकीट दर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात वातानुकूलित बसमधून प्रवास करता येणार आहे.

शहरातील ९ आणि ग्रामीण भागातील ७ मार्गांवर बससेवा

सोलापूर शहरातील ९ मार्गांवर आणि ग्रामीण भागातील ७ मार्गांवर अशा एकूण १६ मार्गांवर या इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवेचे दोन सत्रांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहणार आहे.

या बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक असल्यामुळे इंधनावरील पारंपरिक वाहनांच्या तुलनेत वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button