पार्श्वगायक शब्बीर कुमार यांचा जन्मदिवस

भारतीय चित्रपट संगीतातील बेताज बादशाह पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे ३१ जुलै १९८० ला अचानक निधन झाले. रफी यांचे जाणे सर्वांसाठी इतके अनपेक्षित होते की संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली. कारण रफी यांना नजरेसमोर ठेवून अनेक संगीतकारांनी आपल्या रचना तयार करून ठेवल्या होत्या. मग ही गरज पूर्ण करण्यासाठी रफी यांच्यासारख्या गाणा-या अनेक गायकांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सर्व गायकांमध्ये आपल्या मखमली आवाजाची जादूने ऐंशीच्या दशकातील अमिताभ बच्चनपासून चंकी पांडेपर्यंत प्रत्येक नायकासाठी आपला स्वर देणारे गायक शब्बीर कुमार यांचा उदय झाला. आज दि. २६ ऑक्टोबर पार्श्वगायक शब्बीर कुमार यांचा जन्मदिवस.
जुन्या जमान्यातील संगीतकार नौशाद, चित्रगुप्त, आणि शंकर जय किशन या नामवंत संगीतकारांसोबत ८० व ९० च्या दशकातील नव्या संगीतकारांसोबत काम करण्याची संधी मिळालेले शब्बीर कुमार यांनी ‘मुझे पीने का शौक नहीं’, ‘एक्सीडेंट हो गया’, ‘जब हम जवा होंगे’, ‘अपने दिल से बड़ी दुश्मनी की’, ‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’, ‘तुमसे मिलकर ना जाने क्यों’ ही अजरामर गाणी गाऊन सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य केले.
गुजरातमधील बडौदा येथे कुठल्याही संगीत परंपरेची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात २६ ऑक्टोबर १९५४ ला शब्बीर शेख यांचा जन्म झाला. गाण्याचा संबंध आला तो केवळ लहानपणी आईने गायलेल्या अंगाईगीतापुरता. पण तिचे अनुकरण करत असतांना गाणे गुणगुण्याची आवड निर्माण झाली. यातच भर पडली ती शेजा-यांच्या रेडीओवर लागलेली चित्रपटांची सुमधूर गाणी ऐकण्याची. गायनाची आवड असली तरी कुटुंबापुढे आर्थिक अडचण मोठी होती. त्यामुळे पालकांच्या इच्छेनुसार शिक्षण लवकर पूर्ण करुन सरकारी नोकरी मिळविण्याकडे शब्बीर यांचा कल होता. मात्र गाण्यांची आवड स्वस्थ बसू देत नव्हते. लहानपणापासूनच मोहम्मद रफी यांचा डायहार्ड फॅन असलेले शब्बीर शाळा आणि महाविद्यालयात मोहम्मद रफी यांची गाणी गात असे. पुढे बडोद्यामध्ये अनेक ऑर्केस्ट्रामधून ते रफीची गाणी गाऊ लागले. भारतात प्रसिध्द असणा-या मेलडी मेकर्स या ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी होत त्यांनी त्यांनी रफी यांची गाणी गायली. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून शब्बीर यांचा आवाज देशभर पसरला. रफी यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले.
प्रसिद्ध मोहम्मद रफी यांच्या अंत्यविधीला उपस्थित असणा-या शब्बीर यांनी रफी यांना अभिवादन करत असतांना त्यांच्या हातावर लावलेले घड्याळ रफी यांच्या कबरीवर पडले. या घटनेचा दैवी प्रभाव म्हणून सकारात्मक विचार करत शब्बीर नव्या जोमाने रफी यांची गाणी गावू लागले. एक शाम रफी के नाम या कार्यक्रमातून त्यांनी रफी यांची अनेक गाजलेली गाणी सादर करायला सुरुवात केली. याच माध्यमातून १९८१ मध्ये तर्जुबा या चित्रपटाचे संगीतकार उषा खन्ना यांनी चित्रपटात गायची संधी दिली. पुढे उषा खन्ना यांनी ‘आदत से मजबूर’ (१९८२), ‘पिया पिया मुझे अपने ही रंग में’, ‘अनोखा बंधन’ (२९८१) आणि ‘बेखबार’ (१९८३) मधील ‘धुआं धुआं मेरा दिल हुआ’ या गाण्यांसाठीही शब्बीर यांच्या आवाजाचा वापर केला याच काळात संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्यांना ‘बंजारे हम बंजारे’ (बगावत), ‘जब तक प्यार नहीं होता’ (फर्ज और कानून) आणि ‘पास आते रहे’ (मेहंदी रंग लायेगी) या सुपरहिट चित्रपटातून गायनाची संधी शब्बीर यांना मिळाली.
१९८३ हे वर्ष शब्बीरकुमार यांच्यासाठी यशाचा मार्ग उघडणारे वर्ष होते. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘कुली’ आणि आर. डी. बर्मन यांच्या ‘बेताब’ या त्या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले. ‘कुली’ मधून शब्बीर अमिताभ बच्चन यांचा आवाज झाले. नवीन गायकासाठी पदार्पणाच्या वर्षातच अशी संधी मिळणे हे मोठे यश होते. ‘मुझे पीने का शौक नहीं’, ‘जवानी के रेल कहीं’, ‘लंबूजी टिंगुजी’, ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते है’, ‘हम का इश्क हुआ’, ‘अॅक्सिडंट हो गया’ आणि ‘मुबारक हो तुम्हें हज का माहिना’ या गाण्यांनी संपूर्ण भारतातीतील सिनेरसिकांना वेड झावले. त्याचवर्षी आलेल्या ‘बेताब’ या चित्रपटात नवोदित सनी देओलला शब्बीर यांनी आवाज दिला. या चित्रपटात त्यांनी गायलेली ‘जब हम जवा होंगे’, ‘तेरी तसवीर मिल गई’, ‘तुमसे दी आवाज’, ‘अपने दिल से बड़ी दुश्मनी की’ आणि ‘बादल यू गरजता है’ ही गाणी गायली. या चित्रपटाच्या यशाने शब्बीर यांना त्या काळातील सर्वाधिक मागणी असलेल्या गायकांपैकी एक म्हणून चित्रपटसृष्टीत स्थान मिळाले.
शब्बीर कुमार यांच्याकडे संधी स्वतःहून चालून येत होत्या. १९८३ मध्ये प्रेम तपस्या या चित्रपटातील ‘शाम है ये कुछ खोयी खोयी’ हे लता मंगेशकर यांच्यासोबतचे युगलगीत. त्यानंतर संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांनी ‘एक जान है हम’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटात राजीव कपूरचा आवाज म्हणून शब्बीर यांना बोलावले. अनिल कपूर यांच्या ‘वो सात दिन “या पहिल्या चित्रपटासाठीही शब्बीर त्यांचा आवाज बनले. त्यानंतर अनिल कपूरकरिता १९८५ मध्ये ‘मेरी जंग’ या चित्रपटतही पार्श्वगायन केले.यातील ‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’ हे गाणे गाजले.
सुरुवातीच्या गाण्यांच्या यशानंतर शब्बीर यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘बाजी’ (१९८५), ‘सोहनी महिवाल’ (१९८४), ‘गिरफ्तार’ (१९८५), ‘गुलामी’ (१९८५), ‘मर्द’ (१९८५), ‘मेरी जंग’ (१९८५), ‘प्यार झुकता नहीं’ (१९८५), ‘सल्तनत’ (१९८५), ‘तेरी मेहरबानियां’ (१९८५), ‘आप के साथ’ (१९८६), ‘इल्ज़ाम’ (१९८६), ‘डकैत’ (१९८७), ‘दीवाना तेरे नाम का’ (१९८७), ‘इतिहास’ (१९८७), ‘जवाब हम देंगे’ (१९८७), ‘माशुका’ (१९८७), ‘मिस्टर इंडिया’ (१९८७), ‘लोहा’ (१९८७), ‘प्यार मोहब्बत’ (१९८७), ‘पाप की दुनिया’ (१९८७), ‘तेजाब’ (१९८८), ‘आज का अर्जुन’ (१९९०), ‘घायल’ (१९९०), ‘कारनामा’ (१९९०), ‘पाप की कमाई’ (१९९०) आणि ‘शोला और शबनम’ (१९९२) या गाजलेल्या चित्रपटांकरिता गाणी गायली.
१९८० च्या संपूर्ण दशकात, शब्बीर कुमार अमिताभ बच्चन, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर आणि सनी देओल यांच्यासह त्या काळातील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांचा आवाज होते. अभिनेते आणि त्यांच्या शैलींनुसार त्यांच्या गायन शैलीशी जुळवून घेण्याच्या शब्बीर यांच्या क्षमतेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अष्टपैलू गायक म्हणून ते सिध्द झाले. त्यांच्या उल्लेखनीय गाण्यांमध्ये ‘कंगना ओए होय कंगना’, ‘वो सात दिन’ मधील ‘प्यार किया नहीं जाता’, ‘बोल दो मिट्टी बोल सोनिये’, ‘सोहनी महिवाल’ मधील ‘मुझे दूल्हे का सेहरा’ . ‘प्यार झुकता नहीं’ मधील ‘तुमसे मिलकर ना जाने क्यों’, ‘तुमसे अपना साथ बनाने से’, ‘चाहे लाख तूफान आए’, “आना जन लगा रहेगा (गिरफ्तार)” “तेरी मेहरबानियां (तेरी मेहरबानियां)” “ज़हल-ए-मुस्कीन (गुलामी)” मर्द’ मधील “बुरी नजरवाले तेरा” ”ओ माँ शेरो वाली’, “प्यार के दो पल (प्यार के दो पाल)” “जानो जानम जानेमन (सल्तनत)” “जब जब किसी लडके (काला धंदा गोरे लोग)” “हैरान हूं मैं (जवाब हम देंगे)” “मेरे यार को मेरे अल्लाह (डकैत)” “तुझे इतना प्यार करे (कुदरत का कानून)” साजन आजाओ वादा ये (आग ही आग) “सो गया ये जहाँ (तेजाब)” यांचा समावेश आहे. १९८० चे दशक संपत असतांनाही ‘आज का अर्जुन’ मधील ‘गोरी है कलाईयां’ आणि १९९० मधील ‘घायल’ मधील ‘सोचना क्या’ या सुपरहिट गाण्यांसह पार्श्वगायन क्षेत्रात शब्बीर यांचेच वर्चस्व होते. त्यांनी गायलेली गाणी लोकप्रियतेत अव्वलच नाही तर सदाबहार म्हणून आजही ऐकली जातात. नंतरच्या काही गाण्यांमध्ये ‘दिल पे कयामत धाये तुम्हारी चूड़ियां’ (त्यागी) ‘तू पागल प्रेमी आवारा’ (शोला और शबनम) ‘ओ राधा तेरे बिना’ (राधा का संगम) या गाण्यांचा समावेश आहे.
शब्बीर यांनी त्यांच्या कारकिर्दीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुल देव बर्मन आणि अनु मलिक यांच्यासह सर्व आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी ६ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. १९९० दशकाच्या सुरुवातीला, प्रेक्षकांची आवड बदलली याचवेळेस कुमार सानू आणि उदित नारायण यांच्यासारख्या नवीन गायकांचा उदय झाल्याने, शब्बीर कुमार यांच्या कारकिर्दीला काहीसा ब्रेक लागला होता. तत्कालीन सुरेश वाडकर, अन्वर, मोहम्मद अझीझ या १९८० च्या दशकातील सर्व सुपर गायकांसाठी हा काळ उतरणीचा होता.
चित्रपटात पार्श्वगायनासाठी बोलवले जात नसले तरी शब्बीर स्टेज शो आणि म्युझिक अल्बममधील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होतेच. मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले होते. नंतरच्या काळातील काही गाण्यांमध्ये ओ यारो माफ करना (आ अब लौट चलें) किसी ने सच ही कहा है (घाट) जीवन के संग एक और जंग (एक और जंग) या हबीबी (आवारा पागल दीवाना) हमारे बाद (आन) आय डोंट नो व्हाट टू डू (हाऊसफुल) मेरे बच्चे (सतरंगी पॅराशूट) यासह अनेक गाण्यांचा समावेश आहे.
वैयक्तिक जीवनात शब्बीर यांनी मेहताब यांच्या विवाह केला आहे. त्यांचा मुलगा गायक म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या दिलशाद शब्बीर शेख आणि गायिका असलेल्या रुबीना मलिक आणि तेहझिम या दोन मुली त्यांची परंपरा पुढे चालवत आहेत. आईच्या अंगाईगीतामुळे संगीताकडे आकर्षित झालेल्या मुलापासून प्रसिद्ध पार्श्वगायकापर्यंतचा शब्बीर यांचा प्रवास या गायनकलेसाठी समर्पण आणि त्यांच्या अविरत मेहनत यावर शक्य झाला होता.




