सामाजिक
८० रुपये तोळं सोने पाहिलेली आणि एक आणा कप चहा पिलेली पिढी !

दुष्काळात मळमंडा खाल्ल्याचा कटू अनुभव
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) ८० रुपये तोळे तेही २४ कॅरेट सोने पाहिलेली आणि एक आणा कप चहा पाहिलेली पिढी आजही अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात आहे. १९७२ -७३ च्या दुष्काळात जनावरे खाणारे मळमंडा खाण्याचा कटू अनुभवी त्यांच्या ठाई आहे. जुना काळ सोन्याचा होता , माणसं सोन्यासारखी प्रेमळ आणि मायाळू होती. हा संदेश आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतो आहे.
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक चनबसप्पा ईश्वरप्पा चितली (वय ८४ )तसेच नागनळळी येथील दस्तगीर हुसेनी हन्नुरे ( वय ७५ ) यांची अक्कलकोट शहरातील सर्जेराव जाधव सार्वजनिक वाचनालयात भेट झाली. वृत्तपत्र वाचताना सहजच चनबसप्पा चितली गुरुजी यांच्याकडे लक्ष गेले. तसेच दस्तगीर हुसेनी हन्नूरे हे उपस्थित होते .त्या दोन्ही जुन्या जाणत्यांना माहिती द्वारे बोलके केले. आज ज्यांना आपण वयोवृद्ध म्हणतो ती माणसं आजच्या तरुणांना लाजवेल असे जीवन जगत आहेत. वागदरी येथील चनबसप्पा ईश्वराप्पा चितली गुरुजी हे जिल्हा परिषद शाळेत बत्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले आहेत. त्यांचे आज वय ८४ वर्षे इतके आहे. चितली गुरुजींनी जुन्या आठवणी सांगताना ८० रुपये २४ कॅरेट तोळे सोने असलेले दिवस पाहिल्याचे सांगितले. तसेच एक रुपयाला सहा लिटर दूध विकल्याचे सांगितले. एक आणा तसेच पाच पैसे कप चहा पिल्याचे म्हणाले, चितली गुरुजींचे १९५८ साली सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. चितली यांचे वय आज ८४ वर्ष इतके असून ते दररोज पहाटे साडेचार वाजता उठून फिरणे , योगासन करणे आज ही करतात. तसेच स्वतःचे कपडे स्वतः धुणे कपडे टार्च करणे हे स्वतः करतात . १९७२ -७३ साली पडलेल्या भीषण दुष्काळात जनावरांना खाऊ घालण्यात येणारे मळमंडा खाल्ल्याचे सांगितले. जुन्या काळी पाऊस मुबलक असल्याने शेंगा मोठ्या प्रमाणात पिकत असल्याचे चितली गुरुजी यांनी माहिती दिली. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , माजी पंतप्रधान इंदिरा गांधी , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पाहण्याचे भाग्य लाभल्याचे चितली गुरुजींनी सांगितले. चितली गुरुजी हे सध्या वागदरी येथील श्री परमेश्वर देवस्थान मध्ये कुस्ती पंच म्हणून कमिटीमध्ये कार्य करत आहेत.
नागनळळी येथील दस्तगीर हुसेनी हनुरे यांनीही जुन्या काळातील माहिती सांगितली. १९६३ सालच्या दुष्काळामध्ये तसेच १९७२ सालच्या दुष्काळात मळमंडा खाल्ल्याची आठवण सांगितली. एक आणा कप चहा त्याकाळी मिळत होता. १९७२ साली आचेगाव (दक्षिण सोलापूर ) येथे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या .त्यांना व पंडित जवाहरलाल नेहरू , लालबहादूर शास्त्री यांना पाहण्याचा योग आल्याचे दस्तगीर हन्नूरे यांनी सांगितले. पीडब्ल्यूडी विभागात सेवा बजावून दस्तगीर हन्नुरे हे निवृत्त झाले आहेत. जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे जुना काळ हा खरंच सुख समृद्धीने नटलेला होता असे म्हणण्याची वेळ आली आहे. आजचा काळ हा जरी आधुनिक , यांत्रिकीकरणाचा तसेच चौफर विकासाचा जरी असला तरी प्रेम , माया , ममता असलेली माणसं नाहीशी होत असल्याचे चनबसप्पा चितली व दस्तगीर हन्नुरे याने सांगितले. तत्वाला जागणारी , माणुसकीचा झरा असलेली पिढी आता नाहीशी होत असून आताच्या नव्या पिढीला जुन्या जाणत्या लोकांचा आदर्श घेऊनच मार्गक्रमण करावी लागणार आहे. तरच सामाजिक शांती , विकासाचे व्हिजन , नव्या पिढीत वैचारिक समृद्धी येण्यास मदत होणार आहे.




