सामाजिक
अक्कलकोट येथे सोशल मीडियाच्या मदतीने चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर आजोबा सुखरूप कुटुंबीयांच्या सुपूर्त

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):दि. ११ सप्टेंबर रोजी अक्कलकोट शहरातील घाडगे दूध डेअरीसमोर रस्त्याच्या कडेला आढळलेल्या नामदेव बलभीम ठाकरे (रा. कोरफळे, ता. बार्शी) यांची माहिती घाडगे दूध डेअरीचे मालक उत्तम घाटगे यांनी सामाजिक कार्यकर्त्याना दिली. त्यांच्या तत्परतेमुळे सामाजिक कार्यकर्तेनां आजोबांपर्यंत पोहोचता आले आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. पोस्ट व्हायरल होताच अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागला.
यानंतर नातेवाईकांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. प्रतिसाद मिळण्यात विलंब होत असल्याने पोलीस कर्मचारी संजय ठेगळे
तसेच आसिफ शेख यांच्या माध्यमातून कुटुंबीय व गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून आजोबांना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान आजोबा चार दिवस होते. त्या परिसरातील नागरिकांनी माणुसकी जपत चार दिवस जेवण, बिस्किटे व पाण्याची व्यवस्था केली.
ज्या ठिकाणी आजोबा चार दिवस होते, त्या ठिकाणच्या समोरील घरातील दोन महिलांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता चारही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले, त्यांना जेवण दिले आणि ते पडल्यास त्यांना उचलून सुरक्षित ठिकाणी बसवले.
या दोन महिलांची निस्वार्थ माणुसकी या संपूर्ण घटनेतील अत्यंत महत्त्वाची बाजू ठरली.
अखेर दि.१५ सप्टेंबर रोजी अक्कलकोट पोलीस ठाण्यात आजोबांचे पुत्र व त्यांच्या मित्राला बोलावून घेण्यात आले आणि नामदेव बलभीम ठाकरे यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
या कार्यात पोलीस निरीक्षक अविनाश पवार पोलीस संजय ठेगळे ,आसिफ शेख ,सुतार , सामाजिक कार्यकर्ते रशीद खिस्तके, सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, आलीम खिस्तके तसेच घाडगे दूध डेअरीचे मालक उत्तम घाडगे, त्या दोन महिला आणि परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माणुसकी हाच खरा धर्म ही शिकवण अक्कलकोटातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस कर्मचारी व नागरीकांनी दिली आहे.



