सामाजिक

पार्श्वगायक मोहंमद रफी यांचा 31 जुलै स्मृतिदिवस…

तब्बल चार दशके आणि आजही भारतीय सिनेमातील कानसेनांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे पार्श्वगायक मोहंमद रफी यांचा 31 जुलै स्मृतिदिवस….
त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगूभाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी भाषा चित्रपटांच्या (किंवा बॉलिवुड च्या) गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्या बरोबर ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधल्या प्रमुख पार्श्वगायकांपैकी एक होते.
हिंदी सिनेमांत असा प्रसंग अनेक वेळा बघायला मिळतो . अर्थात जुन्या सिनेमांबद्दल बोलतोय.(म्हणजे अगदी इसवीसनापूर्वी नव्हे पण तरीही त्या मानाने जुन्याच!) सध्याच्या नाही. म्हणजे असं असतं की कोणाच्या (हिरोईन किंवा तिची मैत्रीण) तरी घरी पार्टी असते .छान वातावरण असतं. अर्थातच पार्टीला साजेसे कपडे असतात. उंची खाणं/पिणं . . . हसणं-खिदळणं . . . कधीकधी नाचणं देखील ! मग अचानक सगळ्यांना शांत बसण्याची सूचना दिली जाते आणि कोणीतरी हीरोला गाणं म्हणण्याची विनंती करतं.हिरो महाशयांना या पार्टीच्या निमित्ताने एक नामी संधी मिळते – जिच्यावर मी (म्हणजे हिरोने!) एवढं नि:स्वार्थी, निस्सीम, निरतिशय वगैरे प्रेम केलं, ती कशी ‘बेवफा’ निघाली! हिरो गाणं सुरू करतो आणि सगळे एकदम चिडीचूप ! आधीचा सगळा तो मूड . . . तो माहोल . . सगळं गायब. . . हिरो आपल्या शब्दांच्या करामतीतून सूचकपणे किंवा कधी कधी उघडपणे जी कैफियत मांडतो ती सगळे अगदी मनोभावे तल्लीन होऊन ऐकू लागतात.कोणीही त्याला थांबवत नाही- ” अरे आम्ही कशासाठी आलो आणि तू हे काय रडगाणं गातोयस?” असं विचारतही नाही . क्वचित दोघांची एखादी कॉमन मैत्रीण सूचक हसते किंवा ती जर ‘खल-प्रवृत्तीची ‘ असेल तर तिला अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटतात! हीरोला मिळवण्याच्या तिच्या मार्गातला हिरोईन नामक काटा दूर झाल्याचा तो आनंद असतो. पण हिरोचं गाणं चालू राहतं. माझ्या (म्हणजे हिरोच्या !) ‘अशा प्रेमाचा तू स्वीकार का केला नाहीस ? आता या प्रेमभंगामुळे मी ‘गम’ मध्ये बुडून जाईन’ वगैरे वगैरे .
अशा सुरुवातीला आनंदी वातावरण पण नंतर सॅड प्रसंगातील गाणी मात्र खूप छान असतात. कित्येकदा ही गाणी या पार्श्वभूमीचा विचार न करता ऐकली किंवा ती जर माहीतच नसताना ऐकली तर ती रत्नजडित खजिन्यासारखी वाटतात. अशी गाणी आधी ऐकली आणि नंतर त्याचे दृश्य स्वरूप पाहिले की केवढी निराशा होते ! याचे एक अस्सल उदाहरण तुम्हांला सांगतो – कोणे एके काळी ‘हवस’ नावाचा सिनेमा आला होता. अनिल धवन आणि नीतू सिंग यांचा. सध्याच्या पिढीला हे अभिनेते ओळखण्याची/लक्षात ठेवण्यासाठी एक क्लू म्हणजे- वरूण धवनचे काका आणि RK ची आई ! तर त्यात एक अप्रतिम गाणं होतं – ‘तेरी गलियो में ना रखेंगे कदम आज के बाद.. . ‘ संगीतकार उषा खन्ना, गायक मोहम्मद रफी ! साधे सोपे शब्द, दर्दभरी चाल. . . interlude संगीतही छान. . तेरी गलियो में या पहिल्या ओळीच्या ( आणि नंतर कडव्याच्या शेवटीही ) मागे मागे जे व्हिसल ऐकू येतं ते खूप छान वाटतं .ज्या मोहंमद रफीच्या आवाजाने या गाण्यातील साध्या सरळ वाटणा-या ओळींचे सोने केले आहे.
2013 मध्ये भारतीय हिंदी सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाली. यावेळी बीबीसी एशिया नेटवर्कने एक सर्व्हे केला होता. त्यात मोहम्मद रफींना हिंदी सिनेमासृष्टीतील एक महान आवाज म्हणून नावाजले गेले. त्यांनी गायलेले चित्रलेखा चित्रपटातले ‘मन रे तू काहे न धीर धरे’ या गीताला पहिले स्थान मिळाले आहे. या सर्व्हेमध्ये दुसर्‍या स्थानावर तीन गाणी होती. त्यातही रफी यांनी गायलेली दोन गाणी आहेत. 1965 ‘गाईड’ चित्रपटात गायलेले ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ आणि ‘दिन ढल जाए हाय रात न जाए’
मोहम्मद रफी यांच्या गायकी कोणत्याही पुरस्काराला डोळ्यासमोर ठेवून केलेली नव्हती. ती मनापासून केलेली होती. 31 जुलै 1980 ला रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी रफी साहेबांनी या जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेण्याआधी काहीतास त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या आसपास ह्या चित्रपटासाठी ‘शाम फिर क्यो उदास है’ हे गीत म्हटले होते.
मोहम्मद रफी यांच्या अंत्ययात्रेत 10 हजाराहून अधिक चाहते उपस्थित होते. मुंबईत याआधी अंत्ययात्रेला एवढे लोक कधीही मुंबईत जमले नव्हते. जुहू मुस्लिम कब्रस्थानात रफी साहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण 2010 मध्ये हे स्मारक पाडले गेले. आजही त्या ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडाला रफीसाहेबांचे स्मारक समजून त्यांचे चाहते श्रध्दांजली अर्पण करायला जातात. रफी साहेबांच्या जाण्यानंतरही झालेले सात चित्रपट अल्लाहरखा, मर्द, कुली, देशप्रेमी, नसीब, आसपास आणि हिरालाल – पन्नालाल हे त्यांना समर्पित केलेले होते.
रफी साहेब एक गायक असण्यासोबतच एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून चित्रपट दुनियेला परिचीत होते. त्यांच्याबाबत बोलताना लता मंगेशकर म्हणतात, ‘मधुर स्वभावाचे सुरीला माणूस. माझे भाग्य आहे की, माझी बहुतेक गाणी मी त्यांच्या सोबत गायली आहेत. संगीत न समजणार्‍या प्रेक्षकांनाही त्यांच्या गाण्यांनी कानसेन केले आहे.’ रफी साहेब नेहमीच दुसर्‍याना मदत करण्यासाठी पुढे असत. त्यांनी काही संगीतकारांसाठी फुकट गाणीसुध्दा गायली आहेत. कधीही कुणाला रॉयल्टीसाठी अडवून पाहिले नाही. 70 च्या दशकात जेव्हा किशोरकुमार लोकप्रिय होत होते, त्या काळात रफी साहेबांकडे येणारी गाणी कमी होती. तरीही या महान, सहृदय गायकाने कधीही स्पर्धेच्यादृष्टीने त्याकडे पाहिले नाही.
तेरी आवाज की शबनम से
बीते समय में एक आवाज आयी
हे गाणे म्हणजे रफी यांच्या चित्रपटसंगीतातील गायकीचा परमोच्च बिंदू गाठणे काय हे रसिकांना दाखवून दिले. रफी साहेबांचा आवाज म्हणजे भक्तीगीतातील भक्ती, प्रेमगीतातील समर्पणाची भावना, विरह गीतातील विरहाची तरल भावनांचा अनुभव ऐकणार्‍याला होत असे. स्वरातील उठाव आकाशाला गवसणी घालणारा तर आवाजाची खोली समुद्राच्या खोलीची बरोबरी करणारी. जनमानसाच्या मनामनावर कोरलेले नाव मोहम्मद रफी.
गीत म्हणतांना रफी साहेबांनी नेहमी शब्दांपेक्षा त्याच्या भावांवर अधिक लक्ष दिले. गीतातील भावना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचल्यानंतर गीत का नाही मनापर्यंत पोहचणार. म्हणूनच आजही रफी साहेबांची गाणी कोणत्याही पिढीतील प्रेक्षकांना आवडतात.
‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘सर जो तेरा चकराए’ यासारखी दोन टोकांवरची गाणी गातांना त्यातील भावभावनासोबतच ती ज्यांच्यावर चित्रीत होणार आहेत, त्या कलावंतांचाही विचार गायकीत करणारे रफी साहेब. चित्रपट संगीताला एका उंचीपर्यंत पोहचवणार्‍या रफी साहेबांनी चित्रपटसंगीताविषयी आदर निर्माण करण्याचेही काम केले. शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणे असो, की विदेशी संगीतावर रफी साहेबांच्या गायनाची उत्कृष्ट छाप प्रत्येक गाण्यावर यायचीच. रफी साहेबांचा जन्म 24 डिसेंबर 1924 ला पंजाबमधील कोटला सुल्तानसिंह गावात झाला. 14 वर्षांचे असतांनाच कुटुंबासहित लाहोरला गेले. तिथेच शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक उस्ताद बडे गुलाम अली, उस्ताद अब्दुल खान, पंडीत जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. पंजाबी चित्रपट गुल बलोच पासून त्यांनी चित्रपट गायनाची सुरुवात केली. या चित्रपटातील ‘सोणिये नी हिरीये’ हे गाणे त्यांनी जीनत बेगमसोबत गायले होते. गाण्याचे संगीतकार श्याम सुंदर होते. फिरोज निजामी या गायकीने एवढे प्रभावित झाले की, त्यांनी रफी साहेबांना लाहोर रेडीओला नोकरीलाच लावले. तिथे त्यांनी गायलेले ‘यहॉं बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है’ हे गीत फिरोज निजामींनीच कम्पोज केलेले होते. ही गीत त्याकाळात खूप प्रसिध्द झाले होते. हेच गीत ऐकून चित्रपट निर्माता जे.बी.वाडीया यांनी त्यांच्याच नावाचा हट्ट धरला आणि त्यांच्या ‘बाजार’ नावाच्या चित्रपटातील सातही गाणी त्यांनी रफीसाहेबांच्या गायकीतच सादर केली.
नौशाद आणि रफी यांचा जमाना सुरु झाला तेव्हा संगीतकार म्हणून नौशादांनी रफी साहेबांचा विस्मयकारी आवाजाचे मोहमयी रंगपटल विस्तारण्यात मोठी भूमिका केली. रफी आणि नौशाद ही जोडी सुरु झाली ती, 1944 मधील ‘हिंदुस्थान के हम है, हिंदुस्थान हमारा’ या गीतापासून. त्याकाळातील युवाांच्या आशा, आकांक्षा, चिंता आणि स्वप्नांना बुलंद आवाज देणारा रफी साहेबांचा आवाज हिंदुस्थानचा आवाज बनला. 1946 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनमोल घडी’ या चित्रपटातील गीतांनी रफी आणि नौशाद यांच्या संगीतबंध अधिकच दृढ झाला. अर्थात याला एक महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे निव्यर्सनी रफी साहेब. याबाबत एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे, एकदा नौशादनी रेकॉर्डिंग स्टुडिओच्या बाहेर तलत महमूद यांना सिगरेट पितांना पाहिले आणि या गोष्टीवरून ते खूप नाराज झाले. त्यांच्या नुकत्याच सुरु झालेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील सगळी गीते त्यांनी रफी साहेबांना देवून त्यांच्याकडूनच सुरबध्द करवली.
नौशाद एकप्रकारे रफी साहेबांचे फॅन बनले होते. रफी साहेबांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर नौशादनी रफी द लिजेंड ने त्यांना श्रध्दांजली अर्पित केली. यावेळी रफी साहेबांची स्तुती करताना ते म्हणाले, ‘तेरी आवाज की शबनम से धुल जाते थे गम सारे’. त्यांचा हा विश्वास होता की, रफी साहेबांचा आवाज जीवनातील सर्व सुंदरता परावर्तीत करणारा आहे. शतकानुशतके ऐकला जाणारा आवाज आहे. ‘व्हिलेज गर्ल’ या चित्रपटात तर रफी साहेबांबरोबर नौशादांनी एक ड्यूट गाणे केले होते.
50 च्या दशकात नौशाद रफी साहेबांव्यतिरिक्त कोणत्याही गायकासोबत काम करत नव्हते. या दोघांनी लोकप्रिय संगीताचा वापर करून चित्रपटसृष्टीतील गीतांचे आयामच बदलून टाकले. ‘बैजू बावरा’ आणि ‘उडनखटोला’ तसेच नंतरच्या साठच्या दशकातील ‘कोहिनूर’, ‘मेरे महबूब’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘संघर्ष’ ह्या लोकप्रिय झालेल्या चित्रपटांचे संगीतकार नौशाद आणि गायक रफी ही जोडी प्रसिध्द होती. संगीतकार ओ.पी.नय्यर यांनीही रफी साहेबांच्या आवाज शम्मी कपूरकरिता ‘तुमसा नही देखा’, कश्मीर की कली’, आणि जॉय मुखर्जीकरिता ‘फिर वही दिल लाया हू’ या गाण्यांसाठी वापरला. ही गाणी आजही ऐकणार्‍या आपल्या पायावर ठेका धरायला लावतात. या व्यतिरिक्त ‘मेरे सनम’ आणि ‘बहारें फिर भी आयेंगी’ या चित्रपटात संगीतबध्द झालेली गाणी आजही धमाल उडवत आहेत.
अतुलनीय आवाज असलेल्या रफी साहेबांची प्रतिभा आता सर्वच संगीतकारांपर्यंत पोहचली होती. नौशाद साहेबांनंतर त्यांच्या आवाजाचा उपयोग संगीतकार सचिन देव बर्मन यांनीसुध्दा केला. गुरुदत्तच्या ‘कागज के फुल’ मधील गाणी असो किंवा नवकेतनच्या ‘गाइड’, ‘काला बाजार’ किंवा ‘तेरे घर के सामने’ या लोकप्रिय झालेल्या चित्रपटातील गाणी रफी साहेबांनीच गायलेली आहेत. सचिन देव बर्मनांनी संगीतबध्द केलेल्या ‘प्यासा’ ह्या चित्रपटातील गाणी जी रफी साहेबांनी गायली ती आजही आपली जादू टिकवून आहेत. ‘गाइड’ चित्रपटाच्यावेळी किशोरकुमार हे लोकप्रिय गायक होते तरीही या चित्रपटांतील गाणी गाण्यासाठी सचिनदांनी रफी साहेबांच्याच आवाजाचा वापर केला. त्यांच्या आवाजाची लोकप्रियता लोकांमध्येच नाही तर संगीतकारांमध्येच होती हे ‘काला पानी’ आणि ‘फर्ज’ या चित्रपटातील गाण्यांनी सिध्द केले.
चित्रपटसंगीतातील गझलांचे सम्राट मदनमोहन हे रफीसाहेबांच्या आवाजाला परिपूर्ण आवाज म्हणत असत. मदन मोहन संगीतकार आणि गायक रफी साहेब यांनीसुध्दा अनेक चित्रपटातून लोकप्रिय गाणी देवून चित्रपटसंगीताच्या खजिन्यात अनमोल भर टाकली आहे. ‘मै यह सोचकर उसके दरचे उठा था, यह दुनिया यह महफिल, कभी न कभी, कही न कही, कोई न कोई तो आएगा, मुझे ले चलो आज फिर उसी गली में जहॉं पहले पहले ये दिल लडखडाया, चिराग दिल का जलाओ, बहु अंधेरा है’ या गाण्यांमधील जादू फक्त मदनमोहनच संगीतबध्द करू शकतात आणि सूरबध्द केवळ रफीसाहेबच करु शकतात. ‘लैला मजनू’ या चित्रपटाच्यावेळी बहुतेक संगीतकार किशोरकुमार यांचा आवाज वापरत असतांनाही, संगीतकार मदनमोहन यांनी रफीसाहेबांनाच बोलावले. या चित्रपटातील ‘तेरे दर पे आया हू’ आणि ‘बर्बाद ए मोहब्बत की दुआ साथ लिए जा’ ही गाणी एवढी गाजली की त्या काळातल रफीसाहेबांना चित्रपटसंगीताच्या दुनियेत पुन्हा जोमाने काम करण्यास कारणीभूत ठरली. त्यानंतर मग मदनमोहन आणि रफी साहेब या जोडीचे ‘हकीकत’, ‘शराबी’, ‘दुल्हन एक रात की’, ‘नींद हमारी ख्वाब तुम्हारे’, ‘नैनिहाल’, ‘चिराग’, ‘हीर रॉंझा’, ‘दस्तक’, ‘हसते जख्म’ या चित्रपटातील गीतांनी आपली जादू जनमानसाच्या मनावर गाजविली.
रफी साहेबांच्या आवाजाची जादू त्यांच्या स्पर्धक गायकांनाही जाणवली कारण ‘शरारत’ या चित्रपटात काम करत असताना किशोर कुमार यांनी त्यांच्या आवाजातील ‘अजब है दास्ता तेरी ए जिंदगी’ या गाण्यासाठी रफी साहेबांचा आवाज वापरण्याचा आग्रह धरला नसता.
सुरवातीस मोहमंद रफी यांच्या शैलीवरही जुन्या गायकांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो. ( आठवा – मै जिंदगीमे हरदम रोता ही रहां हू १९४९ ) . पण रफींच्या आयुष्यात दोन महत्वाचे संगीतकार १९५२ ते १९६० या काळात आले ते म्हणजे शंकर जय किशन व ओ पी नय्यर . या दोघानी संथ संगीताचा नूरच पार दूर भिरकावून दिला. रफीनी १९५२ नंतर आपली गायकी शैली बनण्यात ओपी नय्यर यांचा हात असल्याचे कबूल केले असे शम्मी साहेबानी एका मुलाखतीत सांगितले होते. ही शैली म्हणजे ” मेलोड्रामा” शैली. या शैलीत प्रत्येक मूड हा थोड्या अतिरेकी प्रमाणात आणायचा असतो. रडणे हसणे , विस्परिंग, मृदुपणा, सारेच थोडे वाढवायचे. असा प्रकार मन्ना डे याना ही करता यायचा पण रफी यांच्या गायनात एकूण एक डझन आवाज लपलेले होते. त्यांच्या आवाजाचा पोत हा नायकाच्या पडद्यावरील रुपाचा ध्वनी माध्यमातील अविष्कार असे. रफी साहेब पुढे १९६९ पर्यंत आघाडीचे पुरूष गायक राहिले ते या दोन कारणाने .
या मेलोड्राम शैलीच्या गायकीची काय काय रूपे रफीनी दाखविली ते पाहणे रंजक आहे.
१) शायराना अंदाज – पूर्वी आपल्या सिनेमात मुस्लिम सोशल नावाचा एक फॉरमॅट होता. त्यात मेरे महबूब, पालकी , दिल हीतो है, चौदवीका चांद ई चित्रे आली. रफी याना शायराचा आवाज हा उत्तम पणे व्यक्त करता येत असे. विशेषत: न थरथरणारा, सुस्पट उचारांचा व प्रसंगी सॉफ्ट व प्रसंगी शार्प होणारा आवाज रफी काढू शकत होते. त्यामुळे मुशायरा म्ह्टले की रफी. असा संकेतच होऊन बसला.
२) देशभक्ताचा आवाज- रफींचे दुसरे सामर्थ्य म्हणजे देशभक्तीपर गीत असले की ते एक वेगळाच मूड त्यांच्या शब्दफेकीत आणत- ऐ वतन ऐ वतन , वतनकी राहमे वतनके नौजवा , कर चले हम फिदा,अपनी आजादिको हम ही गीते ऐकली की कोणालाही स्फुरण चढावे अशी ताकद रफींच्या फेकीत असे. पुढे रफी यानाच गुरू मानणारे महेंद्र कपूर यानी आपला एक नवा देशभक्तीचा पहनावा
पुढे आणला हा भाग वेगळा.
३) लहान मुलांसाठीच्या गीतातील रफी.- हिदी सिनेमात लहान मुलांचे वाढदिवस ई गीताना स्थान असे. त्यात ही मेलोड्रामा शैली रफी खुलवत असत , नन्हे मुनन्नी बच्चे तेरी, रे मामा रे मामा रे, हम भी अगर बच्चे होते, आयी हे बहारे मिटे व चक्के मे चक्का ही गीते पहा .रफी कशी निभावून नेत.
४) शराबी मूड- हा मूड तर रफींचा हात खंडा- निराश शराबी- कभी न कभी , जरा सभ्य शराबी – मैने पीना सीख लिया, विनोदी शराबी- जंगलमे मोर नाचा संत्रस्त शराबी- मैने पी शराब तुमने क्या पिया
यात निरागस , धार्मिक मोहंमद रफी हा माणूस कुठेही आपल्याला आढळणार नाही. आपण पक्के व्यावसायिक पार्श्वगायक आहोत याचे भान रफी व आशा भोसले यानी जितके मनापासून ठेवले आहे त्या पुढे रसिकाची मान झुकलीच पाहिजे.
५) रडका चेहरा- उदास ,हताश रडका नायक व चरित्रनायक साकार करणे यात रफीनी कहरच केला
होता. है द्नुनिया उसीकी , बाबुलकी दुआए लेती जा, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, जाने ने क्या ढूंढती रहती है ये आखे मुझमे, ई गीते यासाठी पुरे आहेत.
६) विशिष्ठ आवाज – रफींनी सिंगापूर या चित्रात ” रासासायंग रे रासा सायां ” असे गाणे गायले आहे. त्यात त्यानी वेगळाच चिनी आवाज काढला आहे, त्यानीच गायलेल्या ले गई दिल गुडिया जापानकी यातील जापान लव इन टोकियो यातील रफीचा आवाज ऐका.
७) विनोदवीरासाठीचा आवाज – प्रत्येक सिनेमात पूर्वी एक विनोदी पात्र नायकाच्या जोडीला असे त्याना सुद्धा रफी वेगळाच बाज असलेला आवाज देत. ऑल लाईन किल्यर, मै बम्बईका बाबू, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, सुनो सुनो मिस चट्रर्जी ई गीते विनोदवीरानी पडद्यावर सादर केली आहेत हे वेगळे सांगावेच लागत नाही.
या खेरीज, टांगेवाला असो खेळणीवाला असो, भिकारी असो सर्वांसाठी पार्श्व गायनाचे भन्नाट दुकान रफी यांच्या मालकीचे होते. रफी गरजू निर्माता गरजू संगीतकार असेल तर कित्येक वेळा या दुकानातील माल उदार हस्ते वाटीत. शम्मीकपूर, जॉनी वॉकर, दिलीप कुमार, राजेंद्रकुमार, यांचे वाटचालीत तर या आवाजाने किती हिस्सा उचलला याचा हिशेबच नाही. एका बाजूस मधुबनमे राधिका वा नाचे मन मोरा गाणारे रफी दुसर्‍या बाजूस बदनपे सितारे किंवा, अकेले अकेले हे गाणे म्हणूच कसे शकतात ? एका बाजूस किसी की यादमे दुनियाके है भुलाये हुवे किंवा तेरी ऑखोंके सिवा चा गजला गाणारे रफी दिवाना मस्ताना किंवा यार चुलबुला है यासारखी नटखट गाणी कशी म्हणू शकतात याचे उत्तर कोठे मिळेल? ३१ जुलै १९८० रोजी मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर मोहम्मद रफी यांचे रात्री १०.२५ वाजता निधन झाले. त्यावेळी ते फक्त ५५ वर्षाचे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button