अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहरातील भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता मैंदर्गी रोडपासून सोलापूर रोडपर्यंत नवीन बायपास तयार करून अक्कलकोटचा रिंग रोड पूर्ण करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील परिवहन भवन येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
अक्कलकोट–तडवळ–कोर्सेगाव–टाकळी SH-211 मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, NH-548B, NH-150E आणि NH-52 या प्रमुख मार्गांच्या विकासामुळे अक्कलकोट परिसरातील वाहतुकीत आगामी काळात मोठी वाढ होणार आहे.
अक्कलकोट हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने सध्या देखील या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविकांची वाहतूक होते. त्यातच नवीन राष्ट्रीय महामार्गांमुळे अवजड आणि मल्टी-ॲक्सेल वाहनांची संख्या वाढणार आहे. ही वाहतूक शहराच्या मध्य भागातून गेल्यास भविष्यात वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास वाढू शकतो. त्यामुळे शहराच्या बाहेरून वाहतूक वळविण्यासाठी रिंग रोड पूर्ण करणे ही काळाची गरज आहे.
सध्या NH-150E मुळे अक्कलकोट रिंग रोडचा एक भाग उपलब्ध आहे. उर्वरित भाग NH-548B ला जोडून मैंदर्गी रोड ते सोलापूर रोडपर्यंत बायपास पूर्ण झाल्यास अक्कलकोट शहराला पूर्ण वळसा देणारी वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. यामुळे जड वाहतूक शहराबाहेरून वळवता येईल, नागरिक आणि भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत होईल. अक्कलकोटच्या भविष्यातील वाहतुकीचा विचार करून या बायपासला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करणार आहे असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.






