लेखक साहित्यीक शंकरराव खरात तराळ अंतराळ या आत्मचरित्रातील प्रसंग

प्रसंग एक – 1927 चा सुमार असावा. लहानगा काळाबिंद्रा शंकर आपल्या श्रमलेल्या दमलेल्या बापासोबत जागल्याच्या कामाला जायचा. एक रात्र अशी आली जेव्हा गावाबाहेरल्या विहिरीत एक शव फुगून वर आले. गावात सर्वत्र बोंब झाली. डोळ्यात बोट घातले तरी काही दिसणार नाही इतका मिट्ट काळोख होता. कोण कधी मरून पडलं आणि कशामुळे मेलं होतं, काहीच कळायला मार्ग नव्हता. रात्री मुडदा वर काढण्याचे कामही कठीण होते.
गावातले म्होरके विहिरीजवळ गोळा झाले. अर्थातच हे सगळेच उच्चजातीय होते. त्यांनी महारवाड्यात निरोप धाडला आणि विहिरीत पडलेल्या शवाची राखण करण्यासाठी जागल्याने ताबडतोब येण्याचे आदेश दिले. मरतुकड्या अशक्त रामा खरातच्या घरी ही वर्दी पोहोचली. इतक्या रात्री विहिरीपाशी कसं बसून राहायचं याच्या चिंतेने त्याची बायको रडू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने लहानगा शंकर जागा झाला..
दंड घातलेल्या जुनेर लुगड्यातली आपली आई इतक्या रात्री रडू लागली म्हणजे नक्कीच काहीतरी अप्रिय दुःखद घडले असणार ह्या जाणिवेने शंकरही रडू लागला. पोर रडू लागल्यावर रामाने बायकोला नजरेने दटावले. तिने पोराला शांत केले. घुंगराची काठी हाती घेऊन रामा खरात त्या विहिरीच्या दिशेने निघाला.
एरव्ही ज्या विहिरीच्या पाण्याला स्पर्शही त्याला करू दिला नसता त्या विहिरीत पडलेल्या एका प्रेताची राखण करण्याचे काम त्याच्याकडे आले होते. शेत एकाचे, प्रेत आणखी कुणाचे तरी आणि त्यातले पाणी फक्त ठराविक लोकांचे, त्या पाण्यावर ज्यांची सावलीही मान्य नव्हती असा इसम मात्र त्याच पाण्यात पडलेल्या कुणा अज्ञाताच्या प्रेताची राखण करण्यासाठी सक्तीने बोलावला गेलेला! सारेच दुःखद आणि क्लेशदायक आर्त!
रामा खरात विहिरीपाशी पोहोचला तेव्हा काही मोजके लोक तिथे उभे होते. त्यांनी गुरकावण्याच्या स्वरातच दुरूनच रामाला दमात घेतलं. “राम्या इथून हलायचं नाय, डोळा लागू दिऊ नगंस, मुडद्यावर ध्यान ठीव नायतर तुझी धडगत नाय!”
रामा खराताने सवयीने मान डोलावली. नाहीतरी त्याने उभ्या आयुष्यात फक्त मान डोलवण्याशिवाय काहीच केलं नव्हतं. त्यानं कधी मान वर करून पाहिलं नव्हतं की कुणावर नजर रोखली नव्हती. तो फक्त हुकुमाची तामिली करण्यासाठी जन्माला आला होता. त्याला त्याचे मत नव्हते की, नव्हता कसला स्वाभिमान! मुळात स्वाभिमान असण्यासाठीची वंशपरंपरागत शक्ती आणि प्रिव्हिलेजेस त्याच्या बाप जन्मात शंभर पिढ्यात कुणातच नव्हते. असो.
रामा विहिरीच्या कठड्यापासून काही अंतर राखून एका धोंड्यानजीक बसून राहिला. रानातलं चावरं त्याला चावत होतं, रातकिडे किर्रर्र करत होते. आभाळात एकदिकून चान्नी नव्हती. गच्च भरून आलेलं काळं जांभळं आभाळ रात्रीदेखील त्याला जाणवत होतं. त्याच ढगामागे कुठे तरी चंद्र दडून होता. दूरवर कुठेतरी कोल्हेकुई होत होती आणि गावातल्या भटक्या कुत्र्यांचे रडणे त्यात भर घालत होते. रानाच्या खालल्ल्या अंगाला कुठेतरी टिटवी ओरडत होती. रामा खरात तसाच बसून होता. त्याला घराची आठवण येत होती.
बाप गेला म्हणून शंकर जागा झाला. बापाकडे जायचं म्हणून त्याने हट्ट धरला. शेवटी बापासाठी भाकरी घेऊन जायचं निमित्त त्याच्या कामी आलं. बरीच तंगडतोड केल्यानंतर तो विहिरीपाशी आला. त्याचे पाय भयंकर दुखत होते मात्र बापाचं सोबत असणं त्याला अधिक सुखावह वाटत होतं. मात्र हा आनंद क्षणिक होता. तिथे येताच त्याला ढवळू लागलं. आसमंतात दूरवर एक दुर्गंध पसरलेला होता. तो उग्र वास त्या मढ्याचा होता. कुठल्याही क्षणी उलटी होईल असं त्याला वाटू लागलं. अखेर रामाने त्याला रागे भरले. त्याने आणलेली भाकरी ह्या उग्र दर्पात खाणं अशक्य आहे हे त्याला पटवून दिलं. त्याला परत पाठवताना एक कानमंत्र दिला, शंकऱ्या तुला सांगून ठेवतो याद राख! हे काम तू करायचं नाय. तू यात खपून जाशील. आमचा जल्म वायफट गेला तुझा जल्म यात गुतू देऊ नगंस.
रामाने काकुळतीच्या स्वरात त्या रात्री जे काही सांगितलं ते लहानग्या शंकरच्या मनावर कोरलं गेलं कारण त्या अंधारलेल्या रात्री विहिरीपाशी मढं राखत बसलेला बाप त्याच्या मस्तकात खिळा ठोकावा तसा रुतून बसला! शंकर घरी येऊन आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडला, त्या माऊलीने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केलं.
दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. प्रेत टम्म फुगलं होतं. काही ठिकाणी फुटलं होतं. त्याचा भयंकर दुर्गंध येत होता. रामाने ते प्रेत बाहेर काढण्याचा आदेश फर्मावला गेला. गावाला रामा खराताची शिवाशिव आता चालत होती कारण मेलेल्या माणसाला शिवायचे होते! प्रेत काढताना रामाला साप चावला, पायात वेदनेची तीव्र सणक आली. रामाचा जीव कळवळला!
त्याला मदत करायची म्हणजे धर्म बाटवण्यासारखं होतं त्यामुळे कुणीही त्याला मदत केली नाही. वरच्या जातीचे लोक फक्त आदेश देत होते, दयेचा लवलेशही नव्हता. लहानगा शंकरही तिथे आला होता. हे सर्व पाहताना त्याचा जीव बापासाठी तीळ तीळ तुटत होता. मनोमन तो ठाम निर्धार करत होता. ती विहीर केवळ एका प्रेताने भरलेली नव्हती तर समग्र दलित समाजाचे दमण केले गेलेले जीव, आत्मे तिथे पाण्यात थिजवले होते. ती अंधारलेली रात्र, ती विहीर, ते प्रेत आणि त्यांची राखण करत बसलेला बेबस बाप शंकर कधीच विसरू शकला नाही!
प्रसंग दोन – त्या रात्रीने शंकरच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. त्याच्या बापाने अक्षरश: रक्ताचे पाणी करून त्याला शाळेत घातले. शंकरला शाळेत प्रवेश मिळणे हे एक दिव्य होते. अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर त्याला शाळेत दाखला मिळाला. त्याचं शाळेत जाणं सोपं नव्हतं. महाराला शिवायचं म्हणजे महत्पाप मानले जाई! मुळात शिक्षण हे शूद्रासाठी नाहीच अशी त्याकाळी धारणा होती. अनेक अपमान आणि हालअपेष्टा सोसून शंकरने शाळेत जाणं जारी ठेवलं.
एके दिवशी रामाच्या घरी एक पत्र येतं. महारवाड्यात कुणालाही वाचता येत नसल्याने रामा ते पत्र घेऊन गुरुजींच्या घरी जातो. शंकर देखील हट्ट करून बापाच्या मागे जातो. गुरुजींच्या घरी जाईपर्यंत रामाच्या जीवात जीव नसतो. त्याच्या मनात लाख विचार येतात. त्याचे तमाम नातलग त्याच्या डोळ्यापुढे तरळून जातात. आपल्याला कुणी आणि का पत्र पाठवले असेल ह्या विचाराचा खोडकिडा त्याचे मस्तक पोखरून काढतो.
गुरुजींचे घर जवळ येते. रामा घरापासून बऱ्याच दूर अंतरावर उभं राहतो आणि त्यांना हाका मारू लागतो. खाली मान घालून उभा असलेला बाप उन्हात घामाच्या धारांनी निथळत उभा आहे आणि आतून कुणीच बाहेर येत नाही, की कुणी प्रतिसाद देत नाही तेव्हा शंकर घायाळ होतो. तो चोरून नजर वर करतो तितक्यात गुरुजी ओसरीवर येतात.
रामाला दूर उभं राहून बोलण्यासाठी निक्षून सांगतात. येण्याचे कारण विचारतात. घायकुतीला आलेला रामा खरात आपल्या हातातले पत्र दाखवत सांगतो, की पत्र वाचून हवंय! गुरुजी त्याला इशारा करतात. तो थोडे पुढे जाऊन पत्र खाली ठेवतो. हे सर्व घडत असताना शंकरच्या जिवाची घालमेल होते. धुळीत माखलेले, भीतीने थरथरणारे बापाचे अनवाणी पाय पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं.
गुरुजी पुढे होऊन पत्र वाचतात, एक क्षण रामाकडे टक लावून पाहतात आणि पुढच्याच क्षणी सांगतात की, ‘ठीक आहे. मी पत्र वाचून दाखवतो’; कुऱ्हाडीकडे निर्देश करत म्हणतात की, “तु आधी लाकडं फोडून दे!” हतबल झालेला रामा लाकडांच्या ढिगाऱ्याकडे पाहतो. अतिशय थकलेल्या अवस्थेतला रामा पुढे जातो, शंकर त्याच्या मागोमाग जातो. जाताना त्याच्या पायाखाली रांगोळी येते. त्याने बापजन्मात असलं काही पाहिलेलं नसतं. त्याला त्याचे अर्थही ठाऊक नव्हते.
शंकरने रांगोळी तुडवताच गुरुजींची सोवळ्यात असलेली बायको ओरडते, आंधळ्या महाराच्या पोरा, तुझे डोळे फुटलेत का म्हणत शिव्यांची लाखोली वाहते. रामा आपल्या पोराला दटावतो, हात जोडतो! अश्राप गायीसारखा डोळ्यात पाणी आणून कामाला लागतो. पंधरवडा जाईल इतके सरपण फोडून होते. रामा घामाघूम होऊन जातो! रामा एकेक ढलपी फोडत असतो तेव्हा शंकर आतल्या आत फुटून निघतो. बघता बघता सगळी लाकडं फोडून होतात.
लाकडं फोडून झाल्यावर, ती एका जागी रचून घेतल्यानंतर अतिशय निर्विकारपणे गुरुजी सांगतात की, पत्रात फार काही लिहिलेलं नाही. तुझी बहीण मरण पावलीय. त्याची बातमी पत्रातनं पाठवलीय. इतकं सांगून सव्य अपसव्य करत गुरुजी घरात निघून जातात! हातात घुसलेली धसकटं चेहऱ्यावर रुतवत रामा खरात आर्त टाहो फोडतो! आपल्या बापाला असं ढसाढसा रडताना पाहून शंकरचं काळीज डोळ्यात येतं! आपली आत्या मेलीय ही बातमी गुरुजींनी आधीच वाचली होती, ती त्यांना लगेच सांगविशी वाटली नाही! त्यांनी आधी खंडीभर लाकडं फोडून घेतली आणि मग बातमी सांगितली याचं विलक्षण शल्य त्या चिमूरड्या जीवाला झालं!
ती वेदना, ते दुःख त्याने बाभूळकाट्यासारखे जपले! हे सर्व दिवस, हा संघर्ष तो कधीही विसरला नाही! त्याने त्या वेदनांचे निखारे बनवले आणि आपल्या मस्तकात भिनवले! तो जीव लावून शिकला. त्याने अशी काही मजल मारली की पुढे जाऊन तत्कालीन मराठवाडा विद्यापिठाचा तो कुलगुरू झाला!
ही दास्तान आहे शंकरराव खरात यांची! बाबसाहेबांनी जर पिचलेल्या शोषित वंचित समाजाला शिक्षणाची उपलब्धी करून दिली नसती तर आजही त्या जीवघेण्या परंपरा स्वरूप बदलून जारी राहिल्या असत्या! इच्छाशक्ती तीव्र असली की माणसाला काहीही असाध्य नाही हे शंकरराव खरातांनी दाखवून दिलं! त्यांच्या जन्मदिनीचे हे स्मरण लाखों कोट्यवधी दलितांच्या संघर्षास समर्पित! माणसाने हिंमत हारू नये, त्याच्या वाट्याला येणाऱ्या दुःख वेदनांना ठोकरून न देता, त्यांनाच आपली ताकद मानावे! जग झुकवता येतं, त्यासाठीचा निग्रह ठाम हवा!
– समीर गायकवाड यांच्या फेसबुक वॉलवरून



