अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार अक्कलकोट तालुक्यात दि. १ मे, २०२६ पासून डिजीटल जनगणना मोहमेला प्रारंभ होणार आहे. २०२७ साली होणारी ही जनगणना पूर्णपणे डीजीटल पध्दतीने पार पडणार असून तालुक्यातील प्रथमच अशा स्वरूपात ही प्रक्रिया राबविली जात आहे अशी माहिती तहसिलदार विनायक मगर यांनी दिली.जनगणनेचा पहिला टप्पा दि. १ मे, २०२६ ते दि. १५ मे २०२६ या कालावधीत होणार असून त्यादरम्यान नागरिकांना स्वयंनोंदणीची सुविधा देण्यात आलेली आहे. नागरिकांनी https://se.censusgov.in या संकेतस्थळावर जाऊन ३४ प्रश्नांची माहिती भरावयाची आहे. नोंदणी पूर्ण झालेनंतर मिळणारा युनिक कोड पुढील टप्प्यात प्रगणकाला देणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात दि. १६ मे २०२६ ते दि. १४ जून, २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरीजाऊन माहिती संकलित करतील. स्वयंनोंदणी केलेल्या नागरिकांना केवळ युनिक कोड देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या जनगणेत नागरिकांची वैयक्तीक माहिती, कुटूंब रचना, घरचा प्रकार, सदस्याची संख्या तसेच घरातील उपलब्ध सुविधा याचा तपशिल गोळा करणेत येणार असून सदरची माहिती केवळ सांख्यिकीक हेतूसाठी वापरली जाणार असून गोपनियतेची पूर्ण हमी देण्यात आली आहे. दरम्यान तालुकास्तरावर पर्यवेक्षक व प्रगणक यांचे प्रशिक्षण सुरू आहेत. सदर जनगणनेचे प्रत्यक्ष कामकाज करणेकरीता अक्क्लकोट तालुक्यातील ६८ पर्यवेक्षक व ४१८ प्रगणकांची नियुक्ती करणेत आलेली आहे. भारतात जनगणनेची परंपरा १८७२ पासून सुरू असून यंदाची जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची सोळावी व स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे. त्याअनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना आवाहन करणेत येते की, जनगणनेच्या कामकाजाकरीता नियुक्त प्रगणक आपले घरी आलेनंतर त्यांना आपली वैयक्तीक माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच स्वजनगणना सुविधेचा लाभ घेऊन जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन तहसिलदार विनायक मगर यांनी केले.