विश्वरत्न ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशातील कोट्यावधी दीनदलीत , वंचित , मागास , अस्पृश्य , शोषित समाजाला धार्मिक , सामाजिक , राजकीय , आर्थिक गुलामगिरीतून बाहेर काढले. हजारो वर्षापासून धर्माच्या विचित्र विचारधारेच्या साखळदंडात बांधून अन्याय , अत्याचार सहन करणाऱ्या समाजाला तसेच नागरिकांना धार्मिक रूढी , परंपरेतून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनकाळात धार्मिक , सामाजिक , शैक्षणिक , राजकीय ,आर्थिक क्षेत्रात काम केले. देशातील मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्री असताना पाण्याचे नियोजन , शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक , धार्मिक , शेती क्षेत्र , राजकीय अशा अनेक क्षेत्रात काम करून भारताला आधुनिक भारत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रकांड विद्वत्तेचा वापर हा समाजासाठी आणि देशासाठी केला. भारताला सर्वाभिमुख संविधान देण्याचे महत्त्वाचे काम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात पत्रकार व संपादक म्हणून अतिशय मोलाचे काम केले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक , राजकीय , धार्मिक , शैक्षणिक चळवळीत वृत्तपत्रानी मोठे जनजागृतीचे काम केले आहे. एखाद्या चळवळीचे वृत्तपत्र नसेल तर ती चळवळ पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते असे अनमोल विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजोद्धाराचा मुख्य उद्देश ठेवून मूकनायक , बहिष्कृत भारत ,प्रबुद्ध भारत ,जनता ही वृत्तपत्रे काढले. डॉक्टर आंबेडकरांचा उद्देश एकच होता की देशातील कोट्यावधी अस्पृश्य ,दीनदलित , शोषित समाजाच्या व्यथा वेदना या जगासमोर आल्या पाहिजेत. देशाच्या इतिहासात प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रातून मूक समाजाच्या वेदनांवर फुंकर मारली होती. हजारो वर्षापासून धर्माच्या विषमतेच्या रूढी , परंपरा , संस्कृतीच्या चिखलात अडकलेल्या अस्पृश्य वर्गाला बाहेर काढण्यासाठी आपली विचारधारा अधिक प्रभावीपणे मांडण्याचे काम डॉक्टर आंबेडकरांनी वृत्तपत्रातून केले. डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळात वृत्तपत्र काढण्याचे दोन उद्देश होते एक म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि समाज सुधारणा करणे. हे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता सखोलपणे समजून घेण्यासाठी मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे अभ्यासली पाहिजेत. मूकनायकाच्या सुरुवातीलाच “काय करू आता धरूनिया भीड । ,निशंक हे तोंड वाजविले ।नव्हे जगी कोणी मुखियाचा जाण । सार्थक लाजून नव्हे हित ।” याद्वारे डॉक्टर आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली होती. ३ एप्रिल १९२७ रोजी डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे नियतकालिक काढले. १९२८ साली समता’ २४ नोव्हेंबर १९३० रोजी जनता ही वृत्तपत्रे सुरू केली. जनता हे वृत्तपत्र अस्पृश्य समाजाचे सर्वाधिक काळ चाललेले वृत्तपत्र ठरले . २५ वर्ष सुरू राहिलेल्या जनता वृत्तपत्राचे १९५६ साली प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आले.
डॉक्टर आंबेडकरांनी विविध वृत्तपत्रातून अस्पृश्य समाजावरील अन्याय , अत्याचार , जातिवाद यावर प्रखर भाषेत टीका केली. आपल्या अभ्यासपूर्ण लेखनामुळे तत्कालीन सरकारला भारत देशातील कोट्यावधी अस्पृश्य , दिन दलितांच्या व्यथा वेदना समजण्यास मदत झाली. डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकारिता केली. डॉक्टर आंबेडकर हे कोट्यावधी जनतेचे नेते होते. त्यांनी विचारधारेशी तडजोड कधीच केली नाही .व्यवस्थेने हजारो वर्षापासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायकाच्या स्वरूपात नवा आवाज मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आक्रमक तितकीच संयमी होती. त्यांच्या लेखनातून विद्वत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी पत्रकारितेसाठी तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीचे मुखपत्र म्हणून त्यांनी वृत्तपत्र चालवले नाही. तर एकूणच जागतिक घडामोडींचा आढावा त्यातून घेतला आहे. वृत्तपत्रे ही विचारधारा पेरण्याचे काम करतात .डॉक्टर आंबेडकरांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून अस्पृश्य समाजात विचारधारा पेरण्याचे महत्त्वाचे काम केले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनीही दिनबंधू हे वृत्तपत्र सुरू करून बहुजन समाजाच्या व्यथा मांडल्या होत्या. डॉक्टर आंबेडकर असो अथवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामान्य जनतेच्या हक्काचा अधिकारांचा कैवार घेणारी पत्रकारिता केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय सुधारणा राजकीय पक्षांच्या भूमिका यावर प्रखरपणे भाष्य केले .आजची पत्रकारिता ही व्यवसायिक झाली असून जनसामान्यांच्या प्रश्नाबाबत काहीच देणे घेणे लागत नाही. अशी अवस्था पत्रकारितेची झाली आहे. राजकीय पक्षांची बटिक झालेल्या पत्रकारितेकडून राष्ट्र आणि समाज विकासाची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांनी समाजासाठी देशासाठी अर्पण केलेली पत्रकारिता ही कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहे.