सामाजिक

परंडा एस.टी. आगारात सवलत कार्ड वाटपात आनंदीआनंद; एजन्सी प्रतिनिधींच्या मनमानीमुळे ज्येष्ठ नागरिक अन् महिलांचे हाल

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )परंडा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) आगारात सवलत कार्ड वाटप प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला असून, संबंधित एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. एजन्सीचे प्रतिनिधी वेळेवर हजर राहत नसल्याने वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग बांधवांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. त्यातच ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने संताप व्यक्त होत असून, राज्याचे परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड (सवलत कार्ड) काढण्यासाठी नागरिक मोठ्या आशेने आगारात येत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्ड वितरणासाठी नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीचे प्रतिनिधी आपल्या मनमानीनुसार कामावर येतात. गुरुवारी सकाळी ७ वाजेपासूनच अनेक ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे होते, मात्र दुपारी उशिरापर्यंत प्रतिनिधी न आल्याने गोंधळ निर्माण झाला. रणरणत्या उन्हात उभे राहून अनेकांना त्रास सहन करावा लागला, तर काहींना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
आर्थिक लुबाडणुकीचा गंभीर आरोप
या प्रक्रियेत केवळ विलंबच नाही, तर आर्थिक लुबाडणूक होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. कार्डसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे काही एजन्सी प्रतिनिधींकडून मागितले जात आहेत. “आम्ही हक्काच्या सवलतीसाठी आलो आहोत की लूट व्हायला?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. काही दलाल आणि एजन्सीमधील साटेलोटे यामुळे हा प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात आहे.
आगार व्यवस्थापकांकडे तक्रारीचा पाढा
त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि ज्येष्ठ प्रवाशांनी आगार व्यवस्थापक बालाजी मुळे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. कार्ड वाटप प्रक्रिया पारदर्शक करावी, एजन्सीला वेळेचे बंधन घालावे आणि वाढीव दर घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या सुरू असलेल्या या ढिसाळ कारभारामुळे एस.टी. प्रशासनाच्या प्रतिमेला तडा जात आहे. जिल्हा प्रशासनाने आणि परिवहन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button