‘मी देव आहे, तुमचे शुद्धीकरण करावे लागेल’ म्हणत भोंदूबाबाचा उच्चशिक्षित महिलांवर अत्याचार

नाशिक – नाशिक येथे एका भोंदूबाबाने धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली अनेक धक्कादायक गैरकृत्ये केल्याचे समोर आले आहे. अशोक खरात असे या कथित बाबाचे नाव असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या भोंदूबाबाचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्याचे उघड झाले असून, या गंभीर प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ‘खबरदार पुढारी’ या दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी ‘मुंबई तक’ ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत या बाबाच्या काळ्या कृत्यांचा सविस्तर पाढा वाचला आहे.
संपादक दत्तात्रय खेमनार यांनी केलेल्या दाव्यानुसार, अशोक खरात याने २०० पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या जाळ्यात अडकलेल्या बहुतांश महिला या उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातील होत्या. हा बाबा महिलांना संमोहित करून किंवा गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची चर्चा होती. मात्र, ‘मी साक्षात देव आहे आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मला तुमच्या गुप्त भागाचे शुद्धीकरण करावे लागेल’, असे सांगून तो महिलांची फसवणूक करत असे. एवढेच नव्हे, तर या अघोरी प्रक्रियेत तो महिलांना स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडत असे, असा अत्यंत संतापजनक दावाही करण्यात आला आहे.
केवळ महिलांचे शोषणच नव्हे, तर आर्थिक फसवणुकीतही हा बाबा मागे नव्हता. धंद्यात नुकसान झालेल्या एका व्यावसायिकाला त्याने साडेतीन लाख रुपये आणि दोन लाख रुपये अशी किंमत सांगून दोन खोटी रत्ने विकून गंडवले. तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या स्त्री-पुरुषांना तो एकमेकांशी अनैतिक संबंध ठेवण्यास सांगत असे. एका बड्या उद्योजकाचे एका महिलेशी संबंध जुळवून आणल्यानंतर, त्या महिलेने गरोदर असल्याचे खोटे नाटक केले. यातून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करून तब्बल २० कोटी रुपये उकळण्यात आले.
या भोंदूबाबाच्या जाळ्यात राजकारणीदेखील अडकले होते. महाराष्ट्रातील एका माजी मंत्री महोदयांना तो एका बाटलीत शक्तीवर्धक गोळ्या मिसळलेले पाणी देत असे. या पाण्याला तो ‘ओशनो जल’ असे म्हणायचा. हे पाणी प्यायल्याने प्रचंड ऊर्जा आणि ताकद मिळेल अशी बतावणी करून त्याने या मंत्र्याचीही मोठी फसवणूक केली आहे.




