आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत दुधनीकरांची सेवा करू – माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे

दुधनीतील मतदार बंधू-भगिनींचे उपकार हे कधीच विसरता येणार नाहीत. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत दुधनीकरांची सेवा करू असे मत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दुधनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला या ठिकाणी घवघवीत असे यश मिळाले आहे. नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व वीस नगरसेवक हे शिंदे गटाचे निवडून आले आहेत. याबाबत बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले , मतदार बंधू भगिनींनी आम्हाला शंभर टक्के यश मिळवून दिले आहे. ७० वर्ष दुधनीसाठी म्हेत्रे घराण्याने काम केले आहे. योगदान दिले आहे. दुधनीतील लोकांनी म्हेत्रे घराण्यावर ६० – ६५ वर्षे अनंत असे उपकार केले आहेत. आशीर्वाद दिले आहेत. म्हेत्रे घराण्यातील तिसरी पिढी ही लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सत्तेवर आली आहे. मागील सहा सात वर्षाचा प्रशासकीय काळ बघून म्हेत्रे घराण्याची सत्ता नसताना कशी परिस्थिती आहे याची प्रचिती मतदारांना आली आहे. मार्केट कमिटीच्या माध्यमातून विरोधकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. लोकांना पोलिसांच्या धमक्या देऊन तोडपाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. लोकांवर दडपशाही सुरू होती. लोक म्हणत होते की सिद्धाराम म्हेत्रे हे गृहराज्यमंत्री असतानाही तसे काम केलेले नाही. साध्या हवालदाराला हाताशी धरून दुधनतील नागरिकांना त्रास देण्यात आला. याबद्दल लोकांच्या मनात संताप होता. या संतापाचा उद्रेक झाला. लोकांना कळून चुकले होते की गाव सांभाळायला म्हेत्रेच सक्षम आहेत. यांना सत्ता दिली पाहिजे असा निर्णय घेत मतदार बंधू भगिनीनी आम्हाला साथ दिली. आम्हाला बहुमताने कौल दिला आहे. दुधनीतील नागरिकांचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत. माझ्या व आमच्या घराण्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दुधनीकरांची सेवा आम्ही करत राहू असे शेवटी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.



