खरंच एक सांताक्लॉज हवा आहे मला….

खरेच एक सांताक्लॉज
हवा आहे मला
फुटपाथवर कुडकुडत झोपलेल्या,
लेकरांवर पांघरूण घालायला
अनाथ मुलांशी मायेने बोलायला…
खरंच एक सांताक्लॉज हवा आहे
आकाशाखाली आयुष्य काढणाऱ्या भटक्या विमुक्तांना घरांचे सरप्राईज द्यायला
व्यवस्थेत हरलेल्या माणसांना
मायेने जवळ घ्यायला
खरंच एक सांताक्लॉज हवा आहे
भुकेल्या माणसांच्या उशाशी,
फूड पॅकेट ठेवायला,
अंधाऱ्या आयुष्यात
दीप लावायला
खरंच एक सांताक्लॉज हवा आहे
इथली सरकार नावाची
यंत्रणा
आणि
त्यातील निर्जीव मनांच्या मुर्दाड फायली
काहीच करणार नसतील,
तर
या काल्पनिक
चमत्काराची वाट बघण्यात,
माझं काय चुकतंय सांताक्लॉज……??
आयुष्यभर रात्रच नशिबी असलेल्या माणसांना,
तू उठव ना सांताक्लॉज
किमान जगण्याची आशा जागव ना
सांताक्लॉज
हरलेल्या माणसांच्या
अगतिकतेतूनच तू
जन्मला
आहेस का
सांताक्लॉज……???
सांग ना सांताक्लॉज….?
हेरंब कुलकर्णी



