राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
मुंबई –
राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.
टिळक भवन येथे आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आज आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका आज पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळी म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे तसेच सामान्य लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे, असे जानकर म्हणाले..



