महाराष्ट्र

सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव

भारताचं वैशिष्ट्य काय असेल, तर या देशाचे सगळे ‘फाउंडिंग फादर्स’ एकाच वेळी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते होते आणि त्याचवेळी ॲकॅडमिशियनही होते! गांधी असोत की नेहरू. आंबेडकर असोत की मौलाना आझाद. हे सारेच तसे होते. 
भारताची ही गोष्ट आहे. अशा माणसांनीच जनजीवन फुलवले. सामान्य माणसाला तेज दिले. त्याला आपल्या लढाईचा केंद्रबिंदू केले. ज्याला कोणी नाही, अशा समूहाला उराशी कवटाळले. म्हणून आजचा भारत उभा आहे. महात्मा फुल्यांसारखा माणूस तेव्हाचा गडगंज कंत्राटदार. नगरसेवक. मात्र, अखेरीस पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी पैसे उरु नयेत, एवढा तो कफल्लक झाला. लोकांसाठी फक्त उरला. फुलेही विचारवंत. तेवढेच कार्यकर्तेही. नंतर यात द्वैत येत गेले. विचारवंत काम करेना. कार्यकर्ता विचार करेना. 
लोकांचे लढे तर संपतच गेले. काही झाले तरी लोक रस्त्यावर येत नाहीत. नव्या माध्यमांनी दिलेला ‘ॲनस्थेशिया’ हे तर एक कारण आहेच, पण ते तेवढेच नाही. नवी व्यवस्था जुन्या व्यवस्थेकडून खूप काही शिकली आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, जनआक्रोशाला संधीही न देता केले जाणारे शोषण. पूर्वीची व्यवस्था करत नसेल, एवढे शोषण आजची भांडवली व्यवस्था करते. शिवाय, तिची सलगी नव्या माध्यमांशी आहे. किंबहुना, तिनेच ही माध्यमे जन्माला घातली आहेत. या दोहोंची सलगी विखारी राजकारणाशी आहे. या नेक्ससमधून जे जग आकाराला आले आहे, तिथे काय आहे? भयंकर शोषण आहे. विखार आहे. विषमता आहे. हुकूमशाही आहे. मात्र, जनआंदोलन तरीही उभे राहात नाही. साधी टाचणी पडली, तरी स्फोटासारखा आवाज यावा, अशी माध्यमे आहेत. तरीही, पाण्यावर तरंग नाही. 
गावागावात तरूण पोरं बिनालग्नाची आहेत. बेरोजगारी आकाशाला भिडली आहे. पीएचडी झालेली पोरं-पोरी दहा-बारा हजारांवर राबत आहेत. पोरांना कैक वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी पोरं निराशेच्या खाईत कोसळली आहेत. शिक्षणाचा बाजार झाला आहे. रुग्णालये गलेलठ्ठ होत आहेत. सामान्य माणूस टाचा घासून मरतो आहे. शेती संपली. साध्या पावसाच्या तडाख्यानंही गावं उद्ध्वस्त झाली. महानगरं कोणत्याही क्षणी प्राण सोडतील, अशी स्थिती आहे. जाती-धर्मांतील भांडणानं अवघ्या देशाची होरपळ सुरू आहे. संविधानिक मार्गानंच संविधानाची पायमल्ली होते आहे. तरीही, लोक रस्त्यावर येत नाहीत. 
मुद्दा फक्त व्यवस्थेचा आणि माध्यमांचा नाही. मुद्दा दहशतीचाही नाही. मुद्दा आहे, लोकांनी विश्वास ठेवावा, असं कोण आहे? काळ बदलला, हे याचं कारण नाही. ट्रम्प आणि पुतिन यांच्यापेक्षाही भयंकर असणारे हिटलर आणि मुसोलिनी होतेच. तेव्हाही, त्याच काळात भारताने गांधी स्वीकारला. सगळ्या दडपशाहीला तो पुरून उरला. एका गांधीने आवाज दिला आणि लाखो बायबापड्यांनी रस्त्यावर उतरून त्यांना प्रतिसाद दिला. एका भीमाने आवाज दिला आणि जनसागर त्याच्यासोबत गेला. 
आज हे घडवण्याची क्षमता असणारे डॉ. बाबा आढाव हे अखेरचे नेते होते. त्यांच्यानंतर आता असे कोणी उरले नाही. हमाल असोत, कामगार, मजूर, मोलकरीण, कचरावेचक वा रिक्षाचालक या सगळ्या कष्टकर्‍यांना रस्त्यावर उतरवतानाच त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याची क्षमता बाबांकडे होती. बाबांना चळवळ समजली होती. संघटन कळले होते. फुल्यांप्रमाणेच नगरसेवक असलेले बाबा राजकारणही कोळून प्यायले होते. ते तसे गांधीवादी, पण गांधीवाद्यांप्रमाणे अडेलतट्टू नव्हते. बाबा समाजवादी, पण नितीश पंथाच्या समाजवाद्यांप्रमाणे भंपक नव्हते. त्यांनी आपल्या प्रतिभेने संघटनाचे नवे मार्ग शोधले. शिवाय, त्या संघटनाच्या मुळाशी व्यापक वैचारिक अधिष्ठान होते. सांस्कृतिक राजकारणाचे भान होते. महात्मा फुल्यांचा सत्यधर्म तिथे होता. सत्याचा ‘अखंड’ आग्रह होता.  
नेहरूंना फुलं प्रिय आणि संगीत-साहित्याची अनिवार ओढ. कलासक्त बाबासाहेब व्हायोलिन वाजवत. मुळात, जग सुंदर करू इच्छिणारे असे हे सारे लोक होते. आपण जगाला काही समजावून सांगतो आहोत, असा आवेश नव्हता. कपाळावर आठ्या नव्हत्या. ही माणसं प्रेमळ होती. कलासक्त होती. त्यामुळंच प्रसन्न होती. गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यात मतभेद कितीही असोत, पण एक साधर्म्य होते. तिघांचेही हसणे गोड होते. तिघेही मिस्किल होते. नर्मविनोदी होते. 
तुम्हाला गंमत सांगतो. ‘साधना’च्या ताज्या अंकामुळं ती आठवली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या हयातीतच मराठवाड्यातील परभणीतल्या पाथरी गावच्या, मातंग समाजातील देवीदासराव नामदेवराव कांबळे नावाच्या एका स्वयंघोषित तरुण पुढाऱ्याने आव्हान दिले होते. ‘बाबासाहेबांना फक्त महार प्रिय आहेत’, अशी त्याची तक्रार होती. त्याने बाबासाहेबांना जोरदार, खरमरीत पत्र लिहिले. त्याला बाबासाहेबांनी दिलेले उत्तर हाच पुरावा आहे, त्यांच्या विनोदबुद्धीचा. अगदी सुरूवात बघा. 
“रा. रा. देवीदासराव नामदेवराव कांबळे यांस अनेक, आपणास काय मायना लिहावा याबद्दल मी बुचकळ्यात पडलो आहे. नमस्कार म्हणावा तर आपण दोघेही ब्राह्मण नाही, जोहार म्हणावा तर आपण मांग, फरमान म्हणावे तर मी महार, आशीर्वाद म्हणावा तर मांगाला आशीर्वाद देणारा महार श्रेष्ठ कोण असा अपवाद यायचा. म्हणून, काहीच न लिहिता चांगदेवासारखी कोरी जागा ठेवून, आपल्या पत्राचे उत्तर देत आहे…”
हे फक्त एक उदाहरण. हा प्रातिभ विनोद आता चळवळींमधून हद्दपार होत चालला आहे. बाबा आढावांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्याकडे हा निखळ विनोद होता. उत्फुल्ल प्रसन्नता होती. म्हणून तर, भेटेल त्याला आधी सोनचाफा देऊन त्याची उमेद बाबा वाढवत असत. 
बाबा कधीच थांबले नाहीत. 
अविरत काम करत राहिले. 
दुसरे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले आहे, असे बाबा सांगत राहिले. ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘हमाल पंचायत’, ‘रिक्षा पंचायत’ अशा पूर्वसंचितावर आला दिवस न ढकलता बाबा नव्या आव्हानांवर रोज काम करत राहिले. जनसंघटन करत राहिले. प्लेगच्या साथीत उतरलेल्या साऊमाईच्या मायेने कोरोनात कष्टकर्‍यांना आधार देत राहिले. 
स्वातंत्र्याचा पहिला सूर्योदय बाबांनी पाहिला आणि नंतर अंधारून आलेलेही त्यांनी पाहिले. पण, उमेद न हरता बाबा काम करत राहिले. कष्टकर्‍यांशी बोलत राहिले. नव्या पिढीशी, नव्या माध्यमातून संवाद करत राहिले. संघर्ष करत राहिले. झोहरान ममदानी न्यूयॉर्कचा महापौर झाल्याचा जेवढा आनंद मीरा नायरांना झाला नसेल, तेवढा बाबांना झाला. फाटकी माणसंच सत्तांध तख्त फोडणार आहेत, याची केवढी खात्री होती त्यांना! तसे ते तरूणाईला सांगत राहिले. नव्या पिढीशी बाबांचा डायलॉग एवढा छान होता की, वयाचे अंतरच सरून जावे. 
बाबा गेले, पण बाबांनी दाखवलेली वाटच परिवर्तनाची खात्री आहे. त्यासाठी कथित विचारवंतांना रस्त्यावर उतरावे लागेल. कार्यकर्त्यांना विचार करावा लागेल. फेसबुकवरच्या आंदोलकांना जमिनीवरचे वास्तव समजून घ्यावे लागेल आणि जमिनीवरच्या कार्यकर्त्याना फेसबुकसह स्नॅपचॅटवरही खाते उघडावे लागेल. आणि, या सगळ्यांनाच सोनचाफ्यासारखे उमलायला शिकावे लागेल. 
अजूनही फुलं उमलताहेत ब्रो…
आपण आशा सोडून कसं चालेल! 
ती सोडली, तर बाबांकडून शिकलो काय आपण?
– संजय आवटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button