तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना, पुनर्वसनासाठी शासनाकडे मागणी करणार
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील संगोगी (ब.) गावाला अतिवृष्टी आणि कुरनूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. गावातील वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे व कुटुंबीयांचे अतोनात हाल झाले आहेत. घरातील साहित्य, जनावरे वाहून गेली आहेत. तसेच संगोगी (ब.) ते तळेवाड गावाला जाणारा बंधाऱ्यावरचा रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटून वाहतूक ठप्प झाली आहे.
रविवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी बाधित संगोगी (ब) गावाला भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांची विचारपूस केली. या भेटीप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर ग्रामस्थांनी डोळ्यात अश्रू आणून आपल्या व्यथा सांगितल्या की, रात्री अचानक पाणी गावात शिरले. आम्हाला काहीच माहिती नव्हती. जीव वाचवण्यासाठी आम्हाला छतावर चढावे लागले. दुसऱ्या दिवशी आम्हाला दोरीच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आले. ७० ते ८० घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली असून घरातील साहित्य आणि जनावरे वाहून गेली. आपत्कालीन व्यवस्थापन असूनदेखील आम्हाला स्थलांतरित केले गेले नाही. प्रशासन निष्क्रिय आहे. गावाचे पुनर्वसन झाले नाही, तर आम्ही आमच्या जमिनी सरकारला दान देऊन रोजीरोटी साठी गाव सोडावे लागेल असे सांगितले.
यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मा. तहसीलदारांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि संगोगी (ब.) गावाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन दिले.
या भेटीला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, माजी नगराध्यक्षा सुवर्णा मलगोंडा, अरुण जाधव, जहांगीर शेख, माजी विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, युवक काँग्रेस पदाधिकारी अनिल सामाणे, नितीन कवडे, निशांत कवडे, ग्रामपंचायत सदस्य कामगोंडा करणकोटी, मोहनराव बिराजदार, रवींद्र हौदे, सिद्धाराम हौदे, श्रीशैल पाटील, सिद्धाराम पाटील, अरुण पाटील, श्रीशैल पाटील, भीमाशंकर करणकोटी, बाबुराव करणकोटी, तहसीलदार विनायक मगर, मंडळ अधिकारी प्रदीप जाधव, ग्रामसेवक नागनाथ जोशी, तलाठी अनिसा अन्सारी, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.