शैक्षणिक
अनंत चैतन्य प्रशालेचा “आषाढी दिंडी सोहळा” भक्तीमय वातावरणात संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक व धार्मिक वैशिष्ट्य मानले जाणारे “विष्णुमय जग,वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा हरिहरा भेद नाही ” अशा स्वरूपाचे सर्वधर्मसमभावाचे शिकवण देणारे वारकरी संप्रदाय विठुमाऊलीच्या दर्शनाच्या ओढीने आसुसलेला,ऊन,वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता,घरदार सोडून,वय विसरून बेभान होऊन पंढरपुर च्या दिशेने निघालेला, नित्यनेमाने वारी करणारा वारकरी ” व त्याची भक्ती याची अनुभूती व्हावी याकरिता -महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे आज ” वारी पर्यावरण रक्षणाची व विठुमाऊलीचा दिंडी सोहळा कार्यक्रम ” अतिशय उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. प्रारंभी प्राचार्य ज्ञानदेव शिंदे यांच्या हस्ते ” विठ्ठल- रुक्मिणी माता पालखी, ज्ञानेश्वर महाराज पालखी व तुकाराम महाराज पालखी या तिन्ही पालखीची पुजा करून आरती करण्यात आली. यानंतर शाळेपासून ते गावातून दिंडी निघाली तेंव्हा गावातील अनेक माताभगिनीनी “विठ्ठल- रुक्मिणी” पालखीचे पाणी घालून, नारळ फोडून जंगी स्वागत केले .टाळ, मृदुंग, वीणा , कपाळास टीळा,गळ्यात तुळशीमाळ घालून,वैष्णव पताका खांद्यावर घेऊन ,मुखाने हरिनामाचा जयघोष करत,झिम्मा ,फुगडी, कोलांट उडी,रिंगण ,भजन करत निघालेली पांढऱ्या वेशभूषेतील मुले व साडी नेसलेल्या मुलींमुळे जणू वारीचेच स्वरूप आले होते.व मुलां- मुलींनी या दिंडी सोबतच गावकऱ्यांना “वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. अप्रतिम अशा या दिंडी सोहळा व पर्यावरण रक्षणाच्या वारीचे संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार . सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य तथा आधारवड सिध्देश्वर कल्याणशेट्टी,संस्थेच्या संचालिका व जि.प. सदस्या शांभवीताई कल्याणशेट्टी,उपसभापती .सागर कल्याणशेट्टी,संचालक मल्लिकार्जुन मसुती, संस्थेच्या सी. ई. ओ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख पुनम कोकळगी यांनी कौतुकासह अभिनंदन केले. ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे समस्त शिक्षक बंधू- भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.






