श्रीक्षेत्र राहेर ते सिद्धेश्वर महादेव मंदिर नरसी कावड यात्रेला शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद!

माजी सभापती श्रावण भिलवंडे यांच्या वतीने आयोजित महाप्रसाद सोहळ्याचा हजारो भाविकांनी घेतला लाभ!
नायगाव / नांदेड :- ( सय्यद अजिम नरसीकर )
श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर हर हर महादेव च्या जयघोषात भक्तिमय उत्साहात काढण्यात आलेल्या नृसिंह मंदिर श्रीक्षेत्र राहेर ते सिद्धेश्वर महादेव मंदिर नरसी या कावड यात्रेला नरसी व पंचक्रोशीतील शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गेल्या तीन वर्षांपासून कावड यात्रेच्या महाप्रसादाचे मानकरी असलेले माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी यावर्षी देखील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे भव्य आयोजन केले होते.यावेळी तीन हजार पेक्षा अधिक भाविकांनी या महाप्रसाद सोहळ्यात उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.
नरसी नगरीचे धार्मिक वैभव उंचावणाऱ्या श्रीक्षेत्र राहेर ते नरसी कावड यात्रा सोहळ्यात प्रतिवर्षी शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत असून यावर्षी महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली.बुधवारी भल्या पहाटे श्रीक्षेत्र राहेर येथील ऐतिहासिक हेमाडपंथी नृसिंह मंदिर व पवित्र गोदापात्रात माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे व इतर शिवभक्तांच्या सानिध्यात महाआरती करून वेदशास्त्र संपन्न संदीप महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदामातेची मनोभावे आराधना करण्यात आली.
शेकडो शिवभक्त कलशात पवित्र गोदावरीचे जल भरलेली कावड खांद्यावर घेवून बम बम भोलेच्या गजरात नरसीच्या दिशेने पायी मार्गस्थ झाले.या दरम्यान ठिकठिकाणी कावड यात्रेतील शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.या पायी यात्रेत शिवभक्तांच्या सुविधेसाठी योगदान देणाऱ्या भक्तांचा श्रावण पाटील भिलवंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी वे.शा.स.संदीप महाराज जोशी यांचे भक्तिमय प्रबोधन देखील पार पडले.देवाधिदेव महादेव यांची गगनचुंबी प्रतिमा कावड यात्रेचे मोठे आकर्षण ठरली.
कावड यात्रेत सहभागी झालेल्या असंख्य महिलांसह सर्व शिवभक्तांनी यात्रा नरसीत पोहचल्यानंतर येथील सुप्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाला गंगाजल अर्पण करून जलाभिषेक केला.सलग तीन वर्षांपासून महाप्रसादाचे मानकरी असलेल्या माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी यंदा देखील हजारो शिवभक्तांच्या प्रसादाची व्यवस्था केली.
कावड यात्रेतील शिवभक्तांसह नायगांव तालुक्यातील तीन हजार पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी श्रावण पाटील भिलवंडे यांनी सर्व भाविकांचे अगत्यपूर्ण आदरातिथ्य करून आभार मानले.
संपूर्ण कावड यात्रेत शेकडो शिवभक्तांसह श्रीक्षेत्र राहेर ते सिद्धेश्वर महादेव मंदिर नरसी पर्यंत स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेत माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी पायी मार्गक्रमण केल्याने भाविकांचा देखील उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र होते.
प्रचंड भक्तीभावाने व अपूर्व उत्साहात संपन्न झालेल्या या भक्तिमय कावड यात्रेत वे.शा.स.संदीप महाराज जोशी, रामकिसन महाराज राजलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे, राजेश भिलवंडे, साईनाथ आक्कमवाड, बालाजी चिंतावार, पत्रकार गोविंद नरसीकर, सुभाष पेरकेवार, कैलास तेलंग, श्रीनिवास आक्कमवाड, मारोतराव वडगावे, अनिल श्रीरामवार, राम खनपट्टे, विनोद भिलवंडे, मारोती बुक्के, नंदेश्वर कोरे, संदीप भिलवंडे, गणेश मेहता, अंकुश खनपटे, रमेश वासरे, संतोष जु्क्कलकर, जयदीप सोनकांबळे, गोविंद मानेमोड, मारोती वडजे, चंदू कोकणे,सोमेश शेटकर आदीसह असंख्य भाविक सहभागी झाले होते.
नरसी येथील सर्व शिवभक्तांनी कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनात परिश्रम घेतले.पुढील वर्षीही भव्य कावड यात्रा काढण्याचा संकल्प करतांना भव्य महाप्रसादासह नरसी येथे विविध धार्मिक व भक्तिमय उपक्रम आयोजित करण्याचा मनोदय महाप्रसादाचे मानकरी असलेले माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांनी व्यक्त केला.



