हर घर लायब्ररी-घर घर लायब्ररी – पात्रूडच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

माजलगाव ( नाजेर कुरेशी )
वाचन ही केवळ एक छंद नाही, तर ती व्यक्तिमत्व घडवणारी प्रक्रिया आहे. याच तत्वाला अनुसरून जिल्हा परिषद हायस्कूल पात्रूड येथे ” हर घर लायब्ररी-घर घर लायब्ररी ” हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि सोशल मीडियाने मुलांचा बराच वेळ व्यापलेला असत. अशा काळात वाचनाकडे पुन्हा वळवण्याचा आणि घराघरात वाचनसंस्कृती रुजवण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
उपक्रमाची रूपरेषा:
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी अस्ताव्यस्त पडलेल्या पुस्तकांना एकत्र करून, घरात एखाद्या कोपऱ्यात नीटनेटका पुस्तक संग्रह तयार केला. काही विद्यार्थ्यांनी पुस्तकं सुसज्ज रचून आकर्षकपणे लायब्ररीचं रूप दिलं व एक My Library साकारली एवढंच नव्हे तर त्यांनी नव्या पुस्तकांची भरही या लायब्ररीत घातली.
विद्यार्थ्यांचा उत्साह:
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला. ते नियमित वाचन करत असून, दर आठवड्याला शाळेत येऊन आपल्या वाचलेल्या पुस्तकावर संवाद साधत आहेत. काही विद्यार्थ्यांनी लहान भावंडांना गोष्टी वाचून दाखवण्यास सुरुवात केली आहे.
पालकांचे योगदान:
या उपक्रमाने केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही प्रेरित झाले आहेत. एका पालकाने सांगितले की, “आमच्या घरी कधीच वाचनाला एवढं महत्त्व मिळालं नव्हतं. आता मुलाच्या वाचनामुळे आम्हीही दररोज काहीतरी वाचतो.”
शेख तय्यब सरांचे विचार:
या उपक्रमाची संकल्पना आणि पुढाकार शाळेतील शिक्षक शेख तय्यब यांनी घेतली.
“पुस्तक हे प्रत्येक घरात असलेच पाहिजे. लहान वयात वाचनाची गोडी लागली, तर ती मुलं आयुष्यभर ज्ञानाच्या वाटेवर चालतात. घर हेच पहिलं विद्यालय आहे, आणि पुस्तकं त्यातले पहिले शिक्षक!” असं शेख सरांनी सांगितलं.
शेवटी:
” हर घर लायब्ररी-घर घर लायब्ररी ” हा उपक्रम फक्त पुस्तकांचे प्रदर्शन नसून, तो विचारांची देवाण-घेवाण, ज्ञानवाढ, आणि कौटुंबिक संवाद वाढवण्याचं साधन ठरत आहे. जिल्हा परिषद हायस्कूल, पात्रुड आणि शेख तय्यब सर यांचे हे योगदान इतर शाळांसाठीही एक प्रेरणास्थान ठरू शकते.