सोलापूर

पाऊस गायब, पिके करपली! सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा – खासदार प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदेंची मागणी; मोहोळ तालुक्यात बांधावर जाऊन जळालेल्या पिकांची पाहणी

मोहोळ : -पावसाने दडी मारल्याने सोलापूर जिल्ह्यात खरीप पिके संकटात सापडली असून, अनेक भागांत सोयाबीनसह अन्य पिके जळून जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

#खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील पाटकुळ, खुनेश्वर, डीकसळ आणि भैरववाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी करपलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जळून चाललेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. प्रत्येक गावातील नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हातातोंडाशी आलेली पिके जळून जात आहेत. या संकटाच्या काळात मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार,” अशी ग्वाही प्रणिती शिंदे यांनी दिली.

#विकासकामांच्या मागण्याही मांडल्या

दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी विविध विकासकामांच्या मागण्या खासदार शिंदे यांच्यासमोर मांडल्या. शिरापूर उपसा सिंचन योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करणे, खुनेश्वरला उजनीचे पाणी देणे, डीकसळ पुलाच्या कठड्याची दुरुस्ती आणि खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

रस्ता खराब असल्याने एस.टी. बससेवाही बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या सर्व प्रश्नांबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.

यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button