टॉप न्यूज
अक्कलकोट बस स्थानक हे चिखलात ! प्रवाशांना सोसावा लागतोय नाहक त्रास

अक्कलकोट ( प्रतिनिधी )तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतील बस स्थानक हे चिखलाने वेढल्याने प्रवासी वर्गाची मोठी तारांबळ उडत असून प्रवाशांना या चिखलातूनच मार्ग काढावा लागत असून नाहक त्रास सोसावा लागत आहे. याबाबत सामाजिक संघटनानी आवाज उठवून ही राज्य परिवहन महामंडळ याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट शहरात नव्याने बस स्थानक बांधणीचे काम जोरदार सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानकाची उभारणी केली आहे. पण या बस स्थानक परिसरात सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत .या चिखलातूनच महिला तसेच वयोवृद्ध लहान मुले शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रवाशांना रस्ता शोधावा लागत आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून हजारो भाविक भक्त येत असतात. एसटी बस मधून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. अक्कलकोट बस स्थानकात उतरल्यानंतर या परगावच्या भाविक प्रवाशांना आपण तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतच आहोत की आणखीन वेगळ्या ठिकाणी आहोत हा प्रश्न पडतो. परगावच्या भाविक तसेच अक्कलकोट तालुक्यातील व कर्नाटकातील आळंद गुलबर्गा – कलबुर्गी अफजलपूर आदी ठिकाणचे प्रवासी हे अक्कलकोट बस स्थानकातूनच सोलापूर सह इतर ठिकाणी प्रवासासाठी जात असतात. महिला वयोवृद्ध लहान मुले शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी अपंग बांधव यांना अक्कलकोट बस स्थानकातील चिखलातूनच बस मध्ये जावे लागत आहे. अक्कलकोट बस स्थानक परिसर हा चिखलमुक्त करण्यासाठी सामाजिक संघटनांनी आंदोलन केले आहे. पण राज्य परिवहन महामंडळाला कोणाच्याच मागणीचे सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. सध्या पावसाळा असून परतीचा मोठा पाऊस सर्वत्र पडत आहे. या पावसामुळे अक्कलकोट बस स्थानक परिसरात चिखल साचून ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. या चिखलातून मार्ग काढताना अबालवद्ध प्रवासी बांधवांची त्रिधा तिरपीट उडत आहे. अक्कलकोट बस स्थानकात येणाऱ्या प्रवासी वर्गाला चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. याकडे आगार प्रमुखांचे लक्ष ना राज्य परिवहन महामंडळाचे. अक्कलकोट बस स्थानकातील या परिस्थितीकडे एसटी महामंडळ लक्ष देत नसल्याने हजारो प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नवीन बस स्थानक सुरू होईपर्यंत या तात्पुरत्या बस स्थानकात प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.



