राजकीय

अक्कलकोट विधानसभेसाठी ६६. ४७  टक्के शांततेत मतदान 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) २५० अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत एकूण ६६.४७  टक्के इतके मतदान झाले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेमध्ये मतदान पार पडले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील १२ उमेदवाराचें भवितव्य मतपेटीत बंद झाले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण मतदार ३ लाख  ८३ हजार  ४७९ पैकी  ८९ हजार ८oo पुरुष तर ९० हजार ९८८ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. दुपारी तीन वाजेपर्यंत ४७.१५ टक्के  इतके मतदान झाले. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक लाख १३ हजार सतरा पुरुष तर एक लाख ११ हजार २३७ स्त्री व इतर आठ अशा दोन लाख २४ हजार २६२ मतदारानी मतदान करत हक्क बजाविला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.४८ टक्के  मतदान झाले. सकाळी ७ सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६६.४७ टक्के इतके मतदान झाले. एकूण २ लाख ५४ हजार ८३३ मतदारानी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये १ लाख ३३ हजार ५९७ पुरुष तर १ लाख २१ हजार २२७ स्त्री मतदार तसेच इतर ९ जणानीं मतदानाचा हक्क बजावला.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी चुरस निर्माण झाली होती. अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पुरुष मतदारांसह महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदान केले. अक्कलकोट शहर मैंदर्गी दुधनी तळवळ जेऊर नागणसूर वागदरी सलगर वळसंग होटगी कुंभारी बोरामणी हन्नूर चपळगाव कुरनूर चुंगी पान मंगरूळ आदींच सर्वत्र मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गर्दी झाली होती. दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. मतदान केंद्राजवळ काँग्रेस भाजपा वंचित बहुजन आघाडी रासपसह विविध पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली होती. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रांवर मतदारानां सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रशासनाकडून  दिव्यांग , वयोवृद्ध मतदारानां खास व्यवस्था सर्वत्र करण्यात आली होती.यावेळी सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

अक्कलकोट विधानसभेसाठी मान्यवरांचे मतदान – अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत विविध मान्यवरांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे त्यांच्या कन्या काँग्रेस पक्ष महिला आघाडी तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे , लक्ष्मी म्हेत्रे आदींनी तालुक्यातील चिंचोळी मै या ठिकाणी मतदानाचा हक्क बजाविला. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांच्यासह हन्नुर येथे मतदानाचा हक्क बजाविला. तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी कन्या प्रशाला अक्कलकोट येथे मतदानाचा हक्क बजाविला. रासपचे उमेदवार सुनील बंडगर यांनी मैंदर्गी येथे मतदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button