श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नऊ महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव

स्त्री-पुरुष समानता जपणे ही नैतिक जबाबदारी : स्वाती शहा
सोलापूर ( प्रतिनिधी ) : सामाजिक कार्यातूनच खऱ्या कर्तृत्वाची ओळख निर्माण होते. स्त्री-पुरुष समानता जपत समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका स्वाती शहा यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी (दि. १०) रूपाभवानी चौकाजवळील हुतात्मा श्रीकिसन सारडा स्मारक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती शहा बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार, समर्थ होमिओपॅथिक क्लिनिकच्या डॉ. गौरी बाचल, इनरव्हील क्लब सोलापूर हार्मनीच्या अध्यक्षा नेहा राठी आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी उपस्थित होते.
नवरात्राच्या पवित्र मुहूर्तावर नऊ महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींच्या विविध रूपांचे प्रतीक असलेल्या महिलांचा गौरव करणे ही आनंदाची बाब आहे. पुरस्कारप्राप्त महिलांनी आपापल्या क्षेत्रांत कार्य करतानाच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. समाजासाठी केलेले कार्य हेच खरे योगदान ठरते. गृहिणी असूनही सामाजिक कार्यात सहभागी होणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जपली पाहिजे, असे आवाहन शहा यांनी केले.
सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले तर अक्षता कासट यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिजीत व्हानकळस, सुरेश लकडे, प्रणव पोतदार, दीपक करकी, संतोष धाकपडे, अजित चव्हाण, महेश भाईकट्टी, अभिषेक दुलंगे, श्रीनाथ श्रीगण, राजेश केकडे, मनुश्री कासट, ज्योती कासट, रुपा कुत्ताते, शिला तापडिया, अनिता रेळेकर आणि शुभांगी लचके आदींनी परिश्रम घेतले.
या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान
मिनाक्षी रामपुरे (कला क्षेत्र), उद्योजिका स्नेहा मकरीये (उद्योग), अमर ज्योती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा वंदना गाडे (सामाजिक), युनिक ब्लॉसम प्रीस्कूलच्या संचालिका गौरी जोग (व्यवस्थापन), डॉ.सिमा तापडिया (वैद्यकीय), एलआयसी ब्रँच मॅनेजर प्रिती विहिरे (विमा क्षेत्र), नर्स रुमाना शेख (आरोग्य), झेडपी शाळा शिक्षिका भुमिका क्षीरसागर (शिक्षण), मनपा बालवाडी शिक्षिका रामेश्वरी बेरुनगी (बाल संस्कार) आदी नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.



