सामाजिक

कृष्णा खोऱ्यातील पुराच्या पाण्यातून अक्कलकोटला ५ टीएमसी पाणी द्या; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

​अक्कलकोट ( प्रतिनिधी )
कृष्णा नदीला येणाऱ्या पुराचे पाणी नीरा-भीमा खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावित योजनेतून अक्कलकोट तालुक्यासाठी ५ टीएमसी (TMC) पाणी मंजूर करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. यासाठी जलसंपदा विभागातर्फे भीमा नदीवरून उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
​सांगली शहर व परिसरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी कृष्णा नदीतील सुमारे ५० टीएमसी अतिरिक्त पाणी नीरा-भीमा नदीकडे वळवण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखले जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कल्याणशेट्टी यांनी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अक्कलकोट हा परिसर कायमस्वरूपी दुष्काळप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे तालुक्यातील जलसंपदा विभागाचे छोटे-मोठे प्रकल्प दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. परिणामी, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या मंजूर पाणी वापरानुसार शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही.
​या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून भीमा नदीत येणाऱ्या पुराच्या पाण्यातून ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे  उचलून तालुक्यातील तुटवड्याच्या प्रकल्पांमध्ये सोडण्यात यावे. पावसाळी हंगामात हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास मंजूर पाण्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. तसेच यामुळे कृष्णा खोऱ्यातील एकूण मंजूर पाणी वापरात कोणतीही वाढ न होता, केवळ उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा मुद्दाही त्यांनी पत्रात मांडला आहे.
प्रतिक्रिया –
अक्कलकोट विधानसभा क्षेत्राला सतत भेडसावणारी पाणी टंचाई आणि दुष्काळी स्थिती यावर कायस्वरूपी मार्ग काढून स्थिती सुधारण्यासाठी कृष्णेच्या पुराचे पाणी निरा भिमा भागाकडे वळवण्याच्या प्रस्तावित योजनेतून आवश्यक पाणी देणे ही येत्या काळातील भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली आहे.
सचिन कल्याणशेट्टी 
आमदार, अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button