अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील हेमांडपंथी श्री जागृत मारुती अन्नछत्र मंडळात श्रावणी शनिवार निमित्त भाविकांची अफाट गर्दी दिसून आली.श्रावणी शनिवारच्या पवित्र पर्वावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ओघ दिवसभर कायम होता.
यावेळी अक्कलकोट येथील विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांना दिवसभर खिरीचा रुचकर महाप्रसाद दिला. महाप्रसादाचा लाभ मिळावा आणि कोणीही भाविक महाप्रसादापासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी काटोक्याने घेण्यात आली. श्रावणी शनिवारनिमित्त महाप्रसाद देण्यात आला.तर दुपारी आरतीचा बहुमान नेमिनाथ कासार गुलबर्गा यांना मिळाला.
दिवसभरात हजारो भाविकांनी मारुतीचे दर्शन घेऊन आणि अन्नछत्रातील महाप्रसाद ग्रहण करून तृप्तता व्यक्त केली.
श्री जागृत मारुती हनुमान हेमांडपंथी मंदिर अतिशय प्राचीन आहे. सलग ११ शनिवार व मंगळवार मारुतीचे दर्शन घेतल्यास मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, अशी जुनी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.या श्रद्धेपोटी महाराष्ट्रासह विविध प्रांतांतून भाविक भक्त नियमितपणे गौडगाव येथे मारुतीच्या दर्शनासाठी येतात. लांबवरून प्रवास करून येणाऱ्या या भक्तांसाठी अन्नछत्र मंडळाकडून भरपेट महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.महाप्रसाद घेतल्यानंतर भक्त पूर्णपणे समाधान व्यक्त करून आपल्या मार्गाला लागतात. तसेच, ज्या भाविकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, ते आपल्या कुवतीनुसार दर्शनावेळी प्रसादाच्या रूपाने अन्नछत्र मंडळाला सढळ हाताने मदत करतात.
मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व विश्वस्त भाविकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची आस्थेने विचारपूस केली जाते आणि त्यांच्या सर्व सोयी-सुविधांची काळजी घेतली जाते. त्यामुळे हे अन्नछत्र मंडळ परिसरातील भाविकांसाठी एक हसते-खेळते आणि आधारवड असलेले आश्रयस्थान बनले आहे.यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक घुगे व इतर पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होते. तशेच शिवशंभु ब्लड बँक यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..






