सामाजिक

एसटी स्टँडवर आस्था रोटी बँकेच्या महिलांनी जपली माणुसकी; चालक-वाहक, हमाल व प्रवाशांना राखी बांधून केले औक्षण

सोलापूर : (प्रतिनिधी )
रक्षाबंधन म्हटले की डोळ्यांसमोर येते ती बहीण-भावाच्या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची नाती… मात्र आपल्या घरापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या भावांना यंदा एका अनोख्या बहिणींच्या प्रेमाची ऊब मिळाली. सोलापूर एसटी स्टँडवर आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा करताना माणुसकीचा सुंदर आदर्श निर्माण केला.
रक्षाबंधन दिनानिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्यांनी सोलापूर एसटी स्टँडवर जाऊन एसटीचे चालक, वाहक, हमाल, प्रवासी तसेच वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांना प्रेमाने राखी बांधून औक्षण केले. अचानक मिळालेल्या या प्रेमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर काहींच्या डोळ्यांत नकळत भावुकता दाटून आली.
एसटीचे अनेक चालक आणि वाहक परगावाहून बस घेऊन सोलापुरात येतात आणि दिवसभर प्रवाशांच्या सेवेत कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यामुळे त्यांना आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे करता येत नाही. अशाच भावांची उणीव भरून काढत आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनगटावर राखी बांधली.
“आज आमच्या बहिणी आमच्यापासून दूर असल्या तरी आस्था रोटी बँकेच्या या भगिनींनी राखी बांधून बहिणीची उणीव जाणवू दिली नाही,” अशा भावना काही चालक-वाहकांनी व्यक्त केल्या. या क्षणी निर्माण झालेला आपुलकीचा संवाद उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
या उपक्रमातून राखीचा धागा रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते अधिक घट्ट करू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सण म्हणजे केवळ घरात आनंद साजरा करणे नव्हे, तर आपल्या आनंदात एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही सहभागी करून घेणे, हाच खऱ्या अर्थाने सणाचा उत्सव असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी नीलिमा हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा मेहता, स्वामी यांच्यासह आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आस्था रोटी बँकेच्या या अनोख्या उपक्रमाचे एसटी स्टँडमधील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी मनापासून कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button