सामाजिक
निम्मा पावसाळा सरला तरी अक्कलकोट तालुक्यातील प्रकल्प कोरडेच !; कुरनूर धरणात ही अल्प पाणीसाठा !

अक्कलकोट (प्रतिनिधी: )
निम्मा पावसाळा सरला तरी अक्कलकोट तालुक्यातील सर्वच प्रकल्प कोरडे पडले असून कुरनूर धरणात जेमतेम १२ टक्के अल्प पाणीसाठा असल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पावसाळा सुरू होऊन ऑगस्ट महिना संपत आला तरी सरासरी पाऊस न झाल्याने भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अक्कलकोट तालुक्यातील सर्व दहा तलाव कोरडे पडले आहेत. बोरगाव, डोंबर जवळगे, घोळसगाव, भुरीकवठे, काजीकणबस, गळोरगी, शिरवळवाडी, हंजगी, सातनदुधनी, करजगी आदी १० तलाव पाऊस नसल्याने कोरडे पडले आहेत. मागील वर्षी पाऊस झाल्याने या तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला होता. कुरनूर धरणात केवळ जवळपास १२ टक्के पाणीसाठा असून धरणावर पाणीपुरवठा असणाऱ्या योजनांवर याचा थेट परिणाम झाला आहे. कुरनूर धरणावर तीन नगरपालिका व नदीकाठच्या ३५ गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. कुरनूर धरणाखालील किणी, अक्कलकोट, निमगाव, मिरजगी, सातन दुधनी, संगोगी, रुद्धेवाडी, बबलाद या सर्व केटीवेअरमध्ये पाणी नसल्याने कोरडे पडले आहेत. अक्कलकोट तालुक्यात पावसा अभावी शेतीसह पिण्याचे पाणी यावर गंभीर परिणाम झाले आहेत. जून आणि जुलै महिन्यात फक्त १६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ऑगस्ट महिन्यात केवळ ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पाऊस नसल्याने तालुक्यातील सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. पावसाळा निम्मा संपला तरी सरासरी पाऊस न झाल्याने शेतकरी व नागरिक हे हवालदिल झाले आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपून जात असल्याने आता केवळ परतीच्या पावसाच्या आशेवर शेतकरी बसला आहे. आता सर्वांच्या नजरा या परतीच्या पावसाकडे लागल्या असून परतीच्या पावसाने जर दमदार हजेरी लावली तर संभाव्य पाणी संकट टळण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. पाऊस नसल्याने अक्कलकोट तालुक्यातील तलाव, नदी, नाले, ओढे कोरडे पडले आहेत. पुढील काळात मुबलक पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा भीषण सामना करण्याची वेळ ही नागरिकांवर येणार आहे.




