सामाजिक
दुधनीच्या विकासाला गती; शासनाकडून ८ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांच्या पाठपुराव्याला यश
अक्कलकोट (प्रतिनिधी ): दुधनी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून सुमारे ८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून, यासंदर्भातील स्वतंत्र शासन आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे.या निधीमुळे दुधनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून शहराचा कायापालट होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.
नगर विकास विभागाच्या रस्ता अनुदान अनिवार्य योजनेअंतर्गत ४.२५ कोटी रुपये व ८५ लाख रुपये अशा दोन स्वतंत्र आदेशांद्वारे दुधनी नगरपरिषदेच्या हद्दीतील सुमारे २१ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.या निधीतून शहरात सिमेंट काँक्रीट रस्ते तसेच भूमिगत गटारींची उभारणी करण्यात येणार आहे.
तसेच वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत २.९० कोटी रुपयांच्या ११ विकासकामांनाही मंजुरी मिळाली आहे.या निधीतून नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय व सभागृहाचे बांधकाम यांसह विविध नागरी सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या निधीसाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. महायुती सरकारच्या सहकार्यामुळे दुधनी शहराच्या विकासाला नवी गती मिळाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी सांगितले की, “दुधनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.मंजूर झालेल्या विकासकामांमुळे शहरातील मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”



