अक्कलकोट ( प्रतिनिधी )
आयुष्यात यश सहज मिळत नाही. प्रत्येक यशामागे संघर्ष, मेहनत, संयम आणि अनेक त्याग दडलेले असतात. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला झिजावे लागते, असे मत अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत लेखक व थोर समाजसेवक प्रा. श्रीपाद महादेव माटे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व केळी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र टाकणे हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार स्वामीराव गायकवाड होते. यावेळी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे, तालुकाध्यक्ष अनिल झंपले, काशिनाथ पंचमगिरी, शिवाजी कोरे, पत्रकार नंदकुमार जगदाळे, राजू जगताप, रमेश भंडारी, मुख्याध्यापक यशवंत पाटील, विश्वनाथ बिराजदार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेंद्र टाकणे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात केलेली मेहनत कदाचित कोणाला दिसत नाही. अनेक वेळा अपयश येते, अडचणी निर्माण होतात, आपली खिल्ली उडवली जाते आणि आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही, असा प्रश्नही पडतो. मात्र, अशा परिस्थितीत हार न मानता सातत्याने प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. कारण आजची मेहनतच उद्याच्या यशाची पायाभरणी करत असते.
आपल्या यशामध्ये आई-वडील आणि शिक्षक यांच्या त्यागाचा व कष्टांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आयुष्यात कितीही मोठे झालो तरी आपल्या यशामागे उभ्या असलेल्या आई-वडिलांना आणि शिक्षकांना कधीही विसरू नये. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवावी आणि आपल्या प्रत्येक यशातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी लेखक व थोर समाजसेवक प्रा. श्रीपाद महादेव माटे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पत्रकार नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड व मुख्याध्यापक यशवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळी व वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम चौधरी यांनी केले, तर आभार मल्लय्या हिरेमठ यांनी मानले.







