भारतातील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट! संयुक्त राष्ट्र संघटनेनेही दिला इशारा

“‘अल निनो’ने उष्णतेच्या आगीत तेल ओतले”
मुंबई – ‘अल निनो’मुळे जगातील अनेक देशांमध्ये प्रचंड उष्णता वाढली आहे. फ्रान्समध्ये एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा व्यक्त केला गेला आहे.
जगभरात उष्णतेचे विक्रम मोडीत निघू लागले आहेत. उष्णतेमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. फ्रान्समध्ये उष्णतेमुळे १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जर्मनी, स्पेन, ब्रिटनसह अनेक युरोपीय देशांमध्ये इतकी तीव्र उष्णता पडत आहे की रस्ते वितळत आहेत.
या वर्षीसारखे तापमान आजपर्यंत कधीच पाहिले नाही, असे लोक म्हणू लागले आहेत. भारतातही अनेक भागांमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान या सारख्या राज्यांमध्ये अजूनही व्यवस्थित पाऊस झालेला नाही. तर वाढत्या तापमानांमागे ‘अल निनो’ हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. आता अल निनोबाबत आलेली नवीन अपडेट चिंता आणखी वाढवणारी आहे.
अल निनोमुळे हवामान बदलाचे (क्लायमेट वॉर्मिंग) संकट गडद होत असताना, भारतासाठी आधी अशी माहिती आली होती की, देशातील १११ जिल्ह्यांवर अल निनोचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, आता नवीन माहितीनुसार, अल निनोमुळे भारतातील १२ राज्यांमधील ३०० जिल्हे प्रभावित होऊ शकतात. म्हणजेच तिथे दष्काळ पडू शकतो.
अल निनोच्या जगावरील संभाव्य धोक्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे की, “येत्या काही महिन्यांत अल निनो आपल्या दारावर धडक देण्याची ९० टक्के शक्यता आहे. जगाने याकडे हवामानाशी संबंधित एक गंभीर धोका म्हणून पाहिले पाहिजे. आधीच तापत असलेल्या जगामध्ये अल निनो हा आगीत तेल ओतण्याचे काम करेल. त्याचे परिणाम अधिक तीव्र आणि दूरगामी असतील, तसेच ते वेगाने देशांच्या सीमा ओलांडतील.”
हा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ‘वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन’च्या ताज्या अहवालात आला आहे. WMOच्या अहवालात म्हटले आहे की, उष्णकटिबंधीय प्रशांत (ट्रॉपिकल पॅसिफिक) महासागराचे पाणी असामान्यपणे गरम झाल्यामुळे ‘अल निनो’ची परिस्थिती निर्माण होत आहे. WMOच्या अंदाजानुसार, जून ते ऑगस्ट २०२६ दरम्यान अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ८० टक्के आहे.
अल निनोची स्थिती किमान नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता ९० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. बहुतेक हवामान मॉडेल्समधून असे दिसून येत आहे की, अल निनो किमान मध्यम स्वरूपाचा असेल, परंतु तो अत्यंत तीव्र देखील असू शकतो.
कृषी मंत्रालय आणि ‘इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चरल रिसर्च’ यांनी संयुक्तपणे वैज्ञानिक आकडेवारीच्या आधारे ३१५ जिल्ह्यांचा अभ्यास केला असून, या जिल्ह्यात कमी पाऊस आणि सिंचनाच्या कमतरतेचा धोका जास्त आहे; कारण या ३१५ जिल्ह्यांमध्ये मॉन्सून कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. यापैकी १११ जिल्हे असे आहेत जिथे सिंचनाची सोय २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, तर ७६ जिल्ह्यांमध्ये २५ ते ५० टक्क्यांपर्यंत सिंचनाची व्यवस्था आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशासह १२ राज्यांमध्ये हे जिल्हे आहेत.



