सामाजिक

अक्कलकोटमध्ये मोहरमचा सोहळा शांततेत, उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी : ) 
अक्कलकोट शहरात मोहरमचा पवित्र सोहळा शुक्रवारी अत्यंत शांततेत, अति उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. शहरातील मौलाली गल्ली, माणिक पेठ, बुधवार पेठ आणि नाईकवाडी गल्ली येथून परंपरेनुसार पंजे व ताबूत (डोली) च्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. 
नाईकवाडी गल्ली येथील डोली मिरवणुकीचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे  व अमोलराजे भोसले यांचे चिरंजीव  हर्षवर्धन अमोलराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा देत शांतता व बंधुभावाचा संदेश दिला. 
अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी एस. एस. पैलवान लेझीम संघाचे उद्घाटन व भाविकांसाठी शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहरातील विविध मान्यवर स्टेजवर उपस्थित होते. नगरसेवक सद्दाम शेरीकर मित्र परिवाराच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सुरेश सूर्यवंशी (वकील काका), पोलीस निरीक्षक सुरेश चिलावर , दिलीप सिद्धे, सुनील सिद्धे,नूर अहमद शेरीकर,नगरसेवक देविदास कवटगी, अविनाश मडीखांबे,हर्षवर्धन अमोलराजे भोसले, नगरसेवक कापसे, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, कांतु धनशेट्टी, प्रदीप पाटील, इरफान दावना, शिकुर शेख, तडमुड , आनंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्कलकोट पोलीस प्रशासनाने संपूर्ण मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुका संपेपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांचे व वेळेचे तंतोतंत पालन करून शहरातील सर्व पंजे व डोली मिरवणुकांचे रात्री १० वाजता विसर्जन करण्यात आले. पोलीस प्रशासन व नागरिकांच्या उत्कृष्ट सहकार्याने संपूर्ण सोहळा शांततेत पार पडला.
मिरवणुकीच्या मार्गावर शहरातील विविध ठिकाणी भाविकांसाठी शरबत व मसाला ज्यूसचे वाटप करण्यात आले होते. “या अली, या हुसैन” च्या गजरात आणि धार्मिक वातावरणात हजारो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. 
यंदाच्या मोहरम मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते नगरसेवक सद्दाम शेरीकर यांचे एस. एस. पैलवान लेझीम संघ. सलग तिसऱ्या वर्षीही या संघाने आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. 
हत्ती तलाव साखर विहिरीजवळ सांगता
शहरातील सर्व पंजे व डोलींचे नाईकवाडी गल्ली येथील हत्ती तलावा जवळील साखर विहीर येथे विसर्जन करून मोहरम सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे व सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button